एक पाडवा असाही.... करोनातला
*एक पाडवा असाही....*
राहुल लाळे
सध्याचे कसोटीचे क्षण...
किंचित धूसर, थोडे भयावह...
त्यात आज वर्षातला पहिला सण...
अशा वेळी अचानक ...
पावसाचं अचानक येणं...
थोडं अनपेक्षित...काहीसं सुखावणारं....
एक पाडवा असाही...
काही दिवस बाहेर जाणं बंद
रस्ते बंद , ऑफिस बंद,
सिनेमा बंद, हॉटेलिंग बंद
थोडसं काम... घरातूनच चालू
पण सारं कसं... मंद मंद
अधून- मधून वाचन
काही वेळ दूरदर्शन
गप्पा, गाणी काही वेळ
दुपारची डुलकीही थोडा वेळ
वातावरण तरीही थोडसं कुंदच
आज पाडवा, विसरलो नव्हतो
उत्साहात सकाळी गुढी उभारली
बायकोला थोडी मदतही केली
मस्त श्रीखंड पुरीवर ताव मारला
नंतर ओटाही आवरुन ठेवला
मध्येच दारं वाजायला लागली
बाहेरची झाडं डोलू लागली
आभाळ एकदम भरुन आलं
ढगांचं गडगडणं सुरु झालं
अचानक धारा बरसू लागल्या
गुढीला माझ्या भिजवून गेल्या
मातीचा सुगंध सुखावून गेला
मनाचा निरुत्साह वाहून गेला
दिवस हेही झरझर झरतील
नवी आव्हाने सामोरी येतील
त्यासाठी परत तयार व्हायचंय
नव्या जोमाने कामाला लागायचंय
बाहेर अजूनही जायचं नाहीये
अंतरंगात, अंतर्मनात जाऊन
कायम काहीतरी शोधायची
संधी मात्र सोडायची नाहीये.....
एक पाडवा असाही.... एक पाडवा असाही...
राहुल लाळे
२५-०३-२०२०

Comments
Post a Comment