एक तरी मुलगी असावी
कन्यादिनानिमित्त...
एक तरी मुलगी असावी
एक तरी मुलगी असावी
उमलताना तिला पहावी
नाजूक नखरे करताना
न्याहाळायला मिळावी
एक तरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
नाना मागण्या पुरवताना
तारांबळ माझी उडावी
एक तरी मुलगी असावी
मैचिंग करताना तिला बघावी
नटता नटता आईला तिने
नात्यातली गंमत शिकवावी
एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं तिने
हळूच कानात सांगावी
एक तरी मुलगी असावी
गालातल्या गालात हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी……!
एक तरी मुलगी असावी
मुलगी नाही ... दुःख नाही...
पण काहीतरी कमी आहे
याची कुठंतरी जाणीव आहे
इतरांचे नशीब घेऊन येण्यात
मुली तशा माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे..
राहुल लाळे


Comments
Post a Comment