सहल....भटकंती, पर्यटन का निवांत विश्रांती*


*सहल....भटकंती, पर्यटन का निवांत विश्रांती*

राहुल लाळे












दररोजच्या रुटीन धकाधकीच्या आयुष्यातून विसांवा , विरंगुळा मिळवण्यासाठी प्रत्येक जण काही तरी मार्ग शोधत असतो .. सिनेमे पाहणे,गाणी म्हणणे -ऐकणे , वाचन , नातेवाईकांकडे जाणे - काहींना काही न करता निवांत  घरात बसून टीव्ही पाहत रमत गमत  दिवस घालवायलाही आवडतं . तर हल्ली अनेक जण देश परदेशांत वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जातात.


या सहलींची एक मजा आहे.. अनेक जण चौधरी यात्रा कंपनी (माझा आक्षेप नाही, निरिक्षण फक्त), एकाच ट्रीपमधे पंधरावीस एकमेकांपासून लांबलांब अंतरांवरची ठिकाणी सहलीला जातात... तर काही एकाच ठिकाणी जाऊन छान रिलॅक्स होतात...काहींना एकटं किंवा कस्टमाईज्ड प्रायव्हेट टूर्स आवडतात तर... काहींना फार तकतक , दगदग  नको म्हणून सर्वसोयीयुक्त केसरी, वीणा वर्ल्ड सारख्या नामांकित ट्रॅव्हल कंपनीकडून व्यवस्थित अरेंज केलेली ट्रीप आवडते. हवामान-ऋतूंप्रमाणे पर्यटनाची ठिकाणे बदलतात. प्रत्येक ठिकाणी जायचा प्रत्येकाचा उद्देश वेगळा... केवळ नवीन आणि प्रसिद्ध जागा पहाण्याबरोबरच करमणूक, प्लेजर, साहसी किंवा स्पोर्ट्स ( ट्रेक, डायव्हिंग, बंगी जंपींग) साठी, धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी, शैक्षणिक अशा अनेक प्रकारच्या सहली होतात. माझ्यासारखी माणसं कामासाठी  देशपरदेशात बाहेर पडली तरी वेळात वेळ काढून कामासाठी गेलेल्या  ठिकाणच्या आसपासच्या पर्यटन स्थळांना भेट देतात... 


मलाही भटकंती करायला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथली स्थळे पहायला,स्थानिक रहाणीमान जाणून घ्यायला आवडतं


लहानपणी सहलीला , पर्यटनाला जाणं आजच्यासारखं सहज व्हायचं नाही.. मला आठवतंय बाहेर जायचं म्हणजे सुट्टीत काका, आत्याकडे  सातारा, सांगली, कोल्हापूरला किंवा मामा, मावशीकडे नासिक, मुंबईला जायचं आणि आसपासची ठिकाणं जमेल तशी पहायची..तसंच चुलत-मावस-आतेमामे भावंंडं पुण्यात आली की पुण्याच्या आसपास हिंडायचं..शाळेत असताना जवळच्या ट्रीप्स व्हायच्या... भोर-भाटघर-बनेश्वर, वाई-पाचगणी-महाबळेश्वर....


मला आठवणारी  आईबाबांच्याबरोबरची लहानपणची

एकच मोठी सहल...तसे बाहेरगावी  (नंतर ते माझ्याबरोबर अनेकदा आले)...आठवी-नववीत असताना, आईच्या ऑफिसमधील सहकारी आणि त्यांच्या परिवाराबरोबर ....अगदी चौधरी यात्रा कंपनी सारखी होती ती ट्रीप...पुण्यापासून सुरू झालेल्या ट्रीप मधे बनेश्वर, भोर, चाफळ, सज्जनगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, गणपतीपुळे, पावस, सावंतवाडी, गोवा, गोकर्ण , जोग फॉल्स ही ठिकाणे एकाच ट्रीपमध्ये केली होती. त्यावेळी बस मध्ये पहिल्यांदाच भेटलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर केलेली धमाल अजूनही आठवते.. याच सहलीमुळे पुढे बहुतेक भटकंतीची सवय लागली असावी...आणि नवनवे मित्र जोडायचीही.


नववी, दहावीत सायकलीवरुन थेऊर, लोहगाव, विठ्ठलवाडी, पद्मावती-तळजाई च्या सहली सुरु झाल्या. आणि पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर ट्रेकिंगची आवड निर्माण झाली लागली...पहिला ट्रेक अकरावीत केलेला कात्रज सिंहगड...याची वेगळीच मजा १८ डोंगर पार करून कात्रजहून सकाळी ६ वाजता निघालेलो  सिंहगडला दुपारी दीडच्या सुमारास पोचलो.. मध्ये दोघातिघांचे बूट फाटले. खाली उतरताना डोळ्यासमोरून साडेचारची शेवटची एसटी गेली..मग पुढे ४-५ किमी आयएटी पर्यंत तंगडतोड करून पीएमटीने पुणं गाठलं. नंतर बरेच ट्रेक केले... हरिश्चंद्रगड, लोहगड विसापूर, वासोटा, ड्यूक्स नोज़, राजगड-तोरणा,.... त्यात अनेक मजा रायगडावर पौर्णिमेला रात्री पेटवलेली होळी, भाज्याच्या लेण्यातला भयावह मुक्काम आणि सकाळी घरी पोचल्यावर तोच डोंगर धसल्याची बातमी, राजमाचीला जाताना रात्री  रस्ता चुकल्यमुळे जबरदस्त पावसांत भिजत- कुडकुडत काढलेली रात्र  ..अनेक आठवणीत रहाणाऱ्या कहाण्या.


शिहणनंतर नोकरीला लागलो, बाकीचे  मित्रमंडळी ही आपापल्या कामात अडकली...नवीन मित्र मिळाले... पूर्वीसारखी भटकंती राहिली नाही... लग्न झाल्यावर कौटुंबिक सहली मात्र खूप झाल्या. एकदा तर चुलतभाऊ आणि त्याची फॅमिली आणि आम्ही, नैनिताल, रानीखेत, देहरादून, मसूरी, सिमला, कुलू मनाली अशी १८ दिवसांची ट्रीप केली... त्यातही अनेक गमती..दिल्लीला जाताना आग्र्यात ब्रेक जर्नी करुन ताजमहल पाहिला...काठगोदाम  एक्सप्रेस दिल्ली (जुनी असं लिहित नाहीत), नवी दिल्ली स्टेशनला जाऊन तिथल्या क्लॉक रूम मध्ये बॅग्स ठेवून

कॅनॉट प्लेसला जाऊन निरुलाज मध्ये खादाडी, आणि नंतर ट्रेन जुन्या दिल्लीहून सुटणार आहे हे कळल्यावर तिथे जायची धावपळ, ऐनवेळी गाडीचा  प्लॅटफॉर्म बदलला जाणं, अशा गोष्टी आता आठवल्या की हसू येतं


कामासाठी अनेकदा देश परदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हाही प्रत्येक वेळी, त्या ठिकाणची आसपासची प्रेक्षणीय स्थळे बघण्याची संधी सोडली नाही

HMT पिंजोर ला गेलो की पिंजोर गार्डन पाहिलंच पण चंदिगड, अमृतसर, भाकरा नांगल धरण, सिमला, आनंदपूर साहिब बघून घेतलं. तीच गोष्ट इतर शहरांच्या बाबतीत. परदेशातही जेव्हा कामासाठी गेलो - तेव्हाही जेवढं जमेल तेवढं साईट सिईंग करून घेतो. अमेरिकेत गेलो तेव्हा नायगारा,फोर्ड म्युझियम , जपान मध्ये टोकियो टॉवर, डिस्नेवर्ड , योकोहामाचे  फुटबॉल स्टेडियम, जर्मनीत जुने कॅसल्स , इटलीत लेक कोमो आणि अनेक .


 सहलीला  गेलो असताना  अनेकदा कितीही प्रयत्न केला तरी त्या ठिकाणच्या - आसपासच्या सर्व जागा  पाहून होत नाहीत , त्यामुळे कधीतरी मन खट्टू होतं .. अशा ठिकाणी काही वर्षांनी मी पुन्हा फक्त न पाहिलेल्या जागाही पाहायला गेलो आहे. 

नव्या प्रदेशात गेल्यावर तिथली बहुतेक ठिकाणं पाहायचा माझा अट्टाहास असतो. पण कधी कधी दीपिका पदुकोणचा जिंदगी ना मिले  दोबारा मधला रणबीर कपूरशी बोलतानाचा डायलॉग आठवतो - "जिंदगीमे कुछ ना कुछ हातसे  छूट  ही जायेगा..जहाँ हो वहीका आनंद ले लो


मग काही  ठिकाणी फक्त निवांत रिलॅक्स होण्यासाठीही जातो - महाबळेश्वरला मस्त पैकी दिनात उतरायचं - सकाळी वेण्णा लेक किंवा विल्सन पॉइंटला , संध्याकाळी परत  लेकवर किंवा मार्केटमध्ये भटकायचं  .. दुपारी छान पुस्तक वाचायची - नागांवला किंवा गोव्याला वार्काला जायचं - सकाळ -संध्याकाळ बीचवर भटकायचं - छान गाणी ऐकायची - पुस्तकं  वाचायची - दररोजच्या धकाधकीच्या आयुष्याला विसरून जायचं - नुसतं आठवूंनच निवांत झालो


अनेकदा नेहमी पहिली जाणारी , ट्रॅव्हल कंपन्यांकडून दाखवली जाणाऱ्या टीकमार्क् ठिकाणांव्यतिरिक्त काही हटके जागा पाहायला मजा येते..उत्तराखंडात बिनसरजवळ जागेश्वर, कोस्टल कर्नाटकात याना केव्हज (मुर्डेश्वरजवळ समुद्रात नेत्रानी बेटाजवळ केलेलं स्कुबा डायविंग), मुन्नारची जगातली सर्वात उंच असणारी कोलूक्कुमलाई टी इस्टेट व फॅक्टरी आणि जीपमधून खडबडीत घाटरस्त्यातून जाताना अनुभवायला मिळणारं अतुलनीय निसर्गसौंदर्य, धर्मशालेजवळ मसरूर येथली एका दगडात  कोरलेली पांडवकालीन मंदिरे, डलहौसीला मुद्दाम आचरट धाडस करून साचपासला जाऊन हिमालयाचं केलेलं अद्भुत निसर्गदर्शन, बीडबिलींगला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव यासारख्या ठिकाणांबरोबरच अगदी शिवथरघळला जाताना वरंधि घाटात आणि पुढे दिसणारा हरपून टाकणारा आपल्याच जवळचा निसर्ग .. अशा अनेक आठवणींनी नवीन सहलीला  जायला हुरूप येतो .


 पर्यटनस्थळ जवळचे असो वा दूरचे, बरोबर मित्रगण असतील तर मैत्री घट्ट होते, नवीन जागांच्या माहिती बरोबरच नवीन ओळखी , नवे मित्र होतात. 


इंजिनिअरिंग फिल्डमधे काम करत असल्याचा फायदा एक असा झाला की जे वाचलं ते अनेकदा कामात प्रत्यक्ष 

करायला, वापरायला अनुभवायला मिळतं...तीच मजा सहलींची, ज्या ठिकाणांबद्दल वाचतो...ती पहायला जातानाची उत्सुकता आणि पहातानाची मजा औरच. 


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका