तो येतोय...श्रीगणेश
*तो येतोय*
राहुल लाळे
तो येतोय
या वर्षी ही तो येतोय
संकटातून, रोजच्या विवंचनेतून
सर्वांना बाहेर काढायला
विघ्नहर्ता येतोय
शिवपार्वतीचा हा पुत्र
दुर्मुखलेल्यांना उल्हसवायला येतोय
भोळाभाबडा रिध्दीसिध्दीचा दाता
हिरमुसल्यांना खुलवायला येतोय
धकाधकीच्या जीवनात
स्वास्थ्य भरायला येतोय
गजबजलेल्या रस्त्यांवर
चैतन्य भरायला,
उदास मनाला
आश्वासायला तो येतोय..
मोदक, निवगिऱ्या , आणि
नाना खाद्यपदार्थ घेऊन
भूक भागवायला तो येतोय
गर्वाचं हरण करायला
सेवेचं व्रत शिकवायला
दुःखहर्ता तो येतोय
भक्तीची सवय जोडायला
शक्तीची आठवण करून द्यायला
तो पुन्हा येतोय
आज त्याला नकोय कसलीच गडबड
नकोय त्याला आज ,अजिबात गोंधळ
सणांचं पावित्र्य राखा, असं तो बजावतोय
गर्दी करु नका , प्रेमानं दटावतोय
स्वतःवर विश्वास ठेवा. संदेश तो देतोय
काळजी करु नका...घ्या असंही सांगतोय
जुने दिवस जातील
नवीन काहीतरी चांगलंच होईल
ही आशा मनात ठेवायची
सुखकर्त्याची त्या रोज आरती करायची
त्याला नको सजावट
नको देखावा त्याला
सर्वांगी सुंदर देव माझा
फक्त भक्तीभावाचा भुकेला
दहा दिवसांनी त्याची मूर्ती विसर्जित होईल
पण मनात मात्र तो कायमच राहील
मनात मात्र तो कायमच राहील
©राहुल लाळे
Sketch courtesy... Vikas Vinayak Patnekar




Comments
Post a Comment