भाई...व्यक्ती का वल्ली..... का आणि काही?*

 *भाई...व्यक्ती का वल्ली..... का आणि काही?*


राहुल लाळे




पु.ल. - लहानपणापासूनचं कौतुकाचं, टिपिकल महाराष्ट्रीयन अभिमानाचं नाव...अनेकदा वाचलं तरीही परत परत वाचलेली त्यांची पुस्तके, माहिती. लेखक, शिक्षक, नाटककार,  नाटक सिनेमातला प्रथितयश नट, चांगला व्यक्ता, संगीतकार, उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि काय काय म्हणून आपण त्यांना ओळखतो. आवडता लेखक म्हणून पहिलं नाव त्यांचच. तशात या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी व्हॉट्सऍप वर त्यांच्याबद्द्लच्या अनेक खऱ्या , काही दंतकथा, ऍनिमेशन्स यांमुळे गेले काही दिवस वातावरण पुलंमय झालं होतं. त्यात महेश मांजरेकरांचा भाई...व्यक्ती का वल्ली हा नवीन सिनेमा येतोय अशी दवंडी पेपर...टीव्ही वर चालू होती. कालपरवा मकरंद अनासपुरेंच्या कलर्स मराठी वरील कार्यक्रमात ही याच सिनेमावर चर्चा चालू होती... त्यामुळे लगेच आज सिनेमा पाहून आलो.

 

अगदी टायटल्सपासूनच जेव्हां सुनीताबाईंच्या मनोगतातून आणि पुलंच्या लहानपणापासून नंतरच्या मुद्रा ऍनिमेशन्स मधून उलगडत जाताना दिसतात तेव्हाच पुढे या खळखळ, निर्धास्त जगणाऱ्या, हसणाऱ्या-हसवणाऱ्या, प्रेक्षकांची गर्दी आवडणाऱ्या आणि रसिकांच्या गर्दीने कायमच डोक्यावर घेतलेल्या मनस्वी कलावंताचे रूप कसे उलगडून पाहायला मिळेल याची कल्पना आली.


लहान असताना मित्रांसोबत ची नाटकांची तालीम, शाळेत असताना तात्यासाहेब केळकरांना विचारलेला "सध्या पुण्याच्या मंडईत अंजिराचा काय भाव चाललाय" हा मिश्किल पण थोडा आचरट प्रश्न, हार्मोनियमची आवड आणि हातोटी पाहून वडलांनी( सचिन खेडेकर) साक्षात गोविंदराव टेंब्यांची पेटी या सर्व प्रसंगांतून पुलंचं उपजतच असलेलं हरहुन्नरी व्यक्तीमत्व चांगलं खुलवलंय. वडिलांनी लहान बाबूलचे (पु ल) हेरलेले गुण आणि दिलेले प्रोत्साहन आजच्या काळातही महत्त्वाचे.


पुलंचे कॉलेजमधले नाथा कामत-नंदू रेगे बरोबरचे, प्रोफेसरांच्या नकला करतानाचे, मर्ढेकरांच्या 'कोणी नको अन् कांही नको' कवितेला चाल देतानाचे प्रसंग मजा आणतात. 


आयुष्यभर जगाच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या माणसालाही अनेक वेळा कटू प्रसंगातून जावं लागलं हे पाहताना डोळे ओलावतात. वडलांच्या अंतिम समयी त्यांच्या आग्रहाखातर 'आम्ही जातो आमच्या गावा' हे भजन ऐकताना गहिवरून येतं. दिवाडकरांच्या  मुलीबरोबर पहिलं लग्न झाल्यावर ती आठवड्याभरात टायफॉईडने गेल्यावर फक्त वडलांच्या शब्दाखातर नाही तर मलाही तू आवडायचीस हे पटवून द्यायला ती थांबली नाही हे पुलंच्या तोंडून ऐकताना नकळत मीही आवंढाही गिळला.


सुनीताबाईंशी ओळख, प्रेम आणि लग्न हे प्रसंगही खुसखुशीत झाले आहेत. विशेषतः वकिलाला वेळ नाही

म्हणून मुहूर्ताच्या आदल्या दिवशीच सह्या करुन लग्न उरकणं, 'चांगल्या शर्टातंच लग्न लागलं पाहिजे असं कुठं लिहून ठेवलंय?' हे वकिलाचे आणि 'इथं माझ्याशिवाय सगळेच विनोदी आहेत' आणि भावाला उद्देशून 'उम्या माझ्या लग्नात तरी उघडा राहू नकोस' हे डायलॉग हशा पिकवतात. इरावती हर्षेंनी सादर केलेली सुनीता करारी.. पण जरा मॉडर्न वाटल्या. आपण प्रेग्नंट आहोत याची पुसटशीही दखल नवऱ्याला नसणं आणि पुढं असंच चालणार म्हणून तो मार्गच बंद करून टाकतानाचा इरावती, पुलंच्या आईची काम करणाऱ्या अश्विनी गिरी आणि सागर देशमुख (भाई) सर्वांचाच अभिनय अप्रतिम आणि सहजही.. एवढ्या मोठ्या विविध ढंगी कलागुण असलेल्या कलाकाराचा प्रवास सहज नसतो त्याला सावरुन सांभाळून घेणं किती कसरत होती आणि सुनीताबाईंनी ती कशी सांभाळली असेल याचा अंदाज येतो. एखादा माणूस आपल्या घरातल्या एवढ्या नाजूक प्रसंगीही आपल्याच कलेत- कामात - नादात बुडतो आणि एका छान आनंदाला मुकतो हे पाहून कलाकारांच्या एककल्ली मनस्वीपणाकडे प्रकर्षाने लक्ष वेधलं जातं. 


सिनेमाची सुरवात पुल डेक्कनवरच्या प्रयाग हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असतानाची आणि तिथे त्यांना भेटायला येणाऱ्या नामांकित व्यक्तीं व बाहेर रसिकांच्या गर्दीने होते. 

वृद्ध सुनीताबाई (शुभांगी दामले) संयमित. सुनिल बर्वे जब्बार न वाटता सुनील बर्वेच वाटला. 

पुलंचा वसंतराव, कुमार गंधर्व, पं भीमसेनजी, चंपूताई (हिराबाई बडोदेकर) यांचे मैत्र चांगले दाखवलंय. त्यांची "सावरे व कानडा राजा पंढरीचा" च्या मैफिलीची या चित्रपटातली बैठक सोशल मिडियावर आधीपासूनच गाजतीय. फक्त त्यांच्या इतर  *बैठक* करण्याबाबतचा उल्लेख थोडा पोरकट वाटतो. कुमारजी म्हणून स्वानंद करकरे शोभले पण भीमसेनजी आणि वसंतराव ओळखून घ्यावे लागतात. सिनेमात खूप सारी पात्रं आहेत... नवे जुने कलाकार आहेत...त्यांचा स्क्रीनवरील वावर कमीजास्त असला तरी प्रत्येक कॅरॅक्टर चांगलं लक्षात राहील याची काळजी महेश मांजरेकरांनी घेतली आहे.


नावात जरी व्यक्ती आणि वल्ली असलं तरी....नाथा कामत (नंदू रेगे), अंतू बर्वे ( अण्णा कर्वे),  रावसाहेब ही पात्रं थोड्या वेगळ्या नावात रुपात दिसतात आणि त्या पात्रांचा...व्यक्तींचा अभ्यास पुलंनी कसा केला असेल याचा अंदाज येतो. गदिमांबरोबरचा 'नाच रे मोरा' ला संगीत देतानाचा सीनही आवडला.


अतुल परचुरे, आनंद इंगळे यांनी पूर्वी पुल सादर केलेत..स्वतः पुलंना प्रत्यक्ष, स्क्रीनवर पाहिलंय, त्यामुळे पुलंच्या भूमिकेत सागर देशमुख कसा दिसेल ही शंका होती.  पण सागरने भाईंच्या भूमिकेसाठी केलेले कष्ट त्याच्या  सहज पणे वावरण्यात ..त्यांच्या लकबी, बोलण्याच्या पध्दती यात दिसतात.  विक्रम गायकवाड यांची वेशभूषा  नेहमी प्रमाणे यशस्वी... सागर भाई वाटला हे सागरबरोबर विक्रमचंही यश.


पुलंबद्दल एवढं वाचलंय, दूरदर्शन, यूट्यूब वर जेवढं पाहिलंय ऐकलंय त्यामुळे सिनेमात दोन एक तासांत काय दाखवणार हा प्रश्न होता...अगदी दिवसभर जरी पहात बसलो तरी कंटाळा येणार नाही अशी परिस्थिती आणि सादरीकरण या सिनेमात आहे... त्यामुळे पुढच्या भागाची वाट आतुरतेने पहायची.


व्यक्ती आणि वल्ली यातली कॅरॅक्टर जरी प्रत्यक्षात कमी दिसली तरी पु ल देशपांडे ही व्यक्ती काय वल्ली होती हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा आणखी एक छान मार्ग...


प्रत्येकाच्या वाट्याला सुखदुःख यांचा एक कोटा असतो त्यातला दुःखाचा कोटा संपवण्यासाठी आणि आनंदाचा कोटा सतत चालू ठेवण्यासाठी पुलंचं साहित्य, त्यांच्यावरील कुठलीही गोष्ट ऐकणं- पाहणं हा एक सोपा मार्ग..


 तसाच हा सिनेमा....भाईंच्या आयुष्यावर किती प्रकाश टाकेल कोणाला किती पटेल, आवडेल.. माहिती नाही 

पण पुलप्रेमींनी पहाणं तर आवश्यक आहे..


© राहुल लाळे

०६-०१-२०१९

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका