सागर किनारी
सागर किनारी....
राहुल
अनेकदा सागर किनारी
थकवा घालवायला जातो
अनवाणी पायांनी चालतो
उडणाऱ्या पक्ष्यांचे आवाज ऐकतो
डोलणाऱ्या होड्या दिसतात
आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात
दूर नभात दिवस उजाडताना पहातो
थंड लाटांनी भिजून जातो
पायात शंख शिंपले टोचतात
आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात
लाटांचे फेस जवळ येतात
किनाऱ्याला मिठी घालतात
सुसाट वाऱ्याबरोबर केसंच काय ताडमाडही हलतात
आणि मनात आठवणींच्या लाटा उसळतात
एका हातात चपला धरून
काही शोधत..
लाटा पावलांवर झेलत मी चालत रहातो
पण तसं काहीच दिसत नाही मला
आणि गाजेशिवाय काही ऐकूही येत नाही...
सगळे काही जसं थांबलं आहे ...आणि ...
मग मनात आठवणींच्या लाटा उसळतात
भासते अचानक मला...
त्या लाटा आत्ता पाण्याच्या नाहीत
त्या आठवणी आहेत ...जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या
आदळत आहेत मनावर माझ्या .. एक एक करून
असे वाटते किनारा कधी संपूच नये
लाटा ह्या कधी थांबूच नयेत..
अन मग
अचानक चालताना वाळूत काहीतरी टोचते पायाला
अन मी पुन्हा येतो ..भानावर...किनाऱ्यावर
ओल्या लाटांमध्ये
अन ..जाणवते
किती लांब आलो मी निघून..
मग...मागे वळून बघतांना
परत...
मनात आठवणींच्या लाटा उसळतात
©राहुल लाळे

खूप छान लिहिलंय....दृश्य काव्य...
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवा राहुल !! दृश्य, ध्वनी, स्पर्श, संवेदना सगळं शब्दात छान पकडलं आहेस
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete