प्रवास - जगण्याच्या आनंदाचा



*प्रवास - जगण्याच्या आनंदाचा*

राहुल लाळे 



 
#जिंदगी जिंदादिलीका नाम है
मुर्दादिल खाक जिया करते है#

इमाम बक्ष नासिख यांचा हा शेर लहानपणापासून ऐकत आलोय, त्यावर अनेकांनी लिहिलेलं , बोललेलं समजून उमजण्याचा आणि तसंच  जिंदादिल रहाण्याचा प्रयत्न कायम करतही आलोय . जिंदगी - जीवन म्हणजे काय फक्त आलेला दिवस पुढे ढकलत जगायचं ?- रडत भेकत - आपल्या त्रासांना कवटाळून जगायचं ?  दुसऱ्यांना मिळणारं सुख आपल्याला का मिळत नाही म्हणून कुढत जगायचं ? …का.. हसत खेळत , "मै जिंदगी का साथ निभाता चला गया - हर फिक्र को धुए  में  उडाता चला गया "  या मूड मध्ये  राहून " जिंदगी एक सफर है सुहाना - यहाँ कल क्या हो किसने जाना " हे जाणून घेऊन आजचा दिवस - आजचा क्षण माझा.. म्हणून आयुष्य पुरेपूर जगायचं ?  काय नक्की असावं ? माणसाचं जगणं आणि पशु-पक्षी-किडे मुंगी यांच्या जगण्यात फरक काय तो भावनांचा , मग हे पशु पक्षी  जर आपले  आयुष्य मजेत घालवत असतील तर मग आपलं जीवन  आपण खुश होण्यासाठी किंवा नैराश्याच्या खाईत - किरकिरत जगण्यासाठी आपल्या भावनांवर का अवलंबून आहे ?  याच भावना, आपली विचारक्षमता सकारात्मकतेने वापरून आपलं आयुष्य स्वतःच्या आणि इतरांच्याही  आनंदासाठी , उपयोगी होण्यासाठी का वापरू नयेत ? जीवनाचा  प्रवास कितीही खडतर  असला तरी  कायम आनंदात,हसऱ्या चेहऱ्याने का करू नये ?

असंच काहीतरी सांगण्यासाठी दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी   " प्रवास - शेष तेच विशेष "  या सिनेमाचे निमित्त साधले असावे . .

चित्रपटाच्या नावातच सिनेमाचं सार आहे हे साधारण लक्षात येते -  अभिजात इनामदार (  अशोक सराफ ) हे पासष्ठीचे  निवृत्त गृहस्थ - दोन्ही  किडन्या निकामी झाल्यामुळे आठवड्यातून दोन वेळा डायलिसिसला जावे लागत असल्यामुळे त्रस्त आहेत. त्यांची काळजी घेणारी - त्यांच्यासाठी धावपळ  करणारी पत्नी लता ( पद्मिनी कोल्हापुरे), अमेरिकेत स्थायिक असलेला मुलगा दिलीप ( स्वतः शशांक उदापूरकर ) आणि अभिजातजींचे डॉक्टरडॉ नेने ( विक्रम गोखले ) ही या सिनेमाची मुख्य पात्र . अभिजातना  होणारा त्रास, वारंवार डायलिसिसला जावं लागल्यामुळे होणारी चिडचिड- उद्वेग,  पथ्य पाळण्याचा कंटाळा किंवा मोहाचे क्षण टाळता न येणे आणि त्यामुळे  परत वाढणारा त्रास - डॉक्टरची पथ्य न सांभाळणे आणि उपचारांना प्रतिसाद न देण्यावरून  बोलणी खाणं अशा दुष्टचक्रात अभिजात अडकलेले असतात. एक अभिनेता बनण्याची सुप्त आकांक्षा असणारे अभिजात , टीव्हीवर दिलीपकुमारचे चित्रपट पाहताना त्याचे डायलॉग्ज ऍक्टिंग करत सादर करून स्वतःचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतात. बायको लता, अभिजातचे सारे मूड्स सांभाळून घर, दवाखाना अशी कसरत मनापासून सांभाळत असते. मुलगा परदेशांतुन वडलांचे रिपोर्ट्स रिकन्फर्म करत असतो आणि त्यांना आपला फोकस  आजारावरून दुसरीकडे कुठे तरी हलवायला सांगत असतो.

पण अभिजात त्यांच्या चक्रातच अडकलेले राहतात.   त्यात अचानक एका आप्ताचा मृत्यू होतो - त्यांच्या अंत्यसंस्काराला अगदी बोटावर मोजण्याएवढी माणसं असतात  - पूर्वी ऑफिसमध्ये बॉस  असताना अनेक  पुढे मागे फिरणारी माणसं तर राहूं देत , त्यांचा एकुलता एक अमेरिकेत राहणारा मुलगाही अंत्यसंस्कारास उपस्थित राहू शकत नाही - हे अभिजातच्या  डोक्यात बसतं  - आपल्यावेळी आपला मुलगा तरी येईल का परदेशातून ? आपण कुणाचंच काही वाकडं केलं नाही मग आपल्यालाच हा त्रास का ? हे प्रश्न त्यांना त्रास देत राहतात आणि ते ही स्वतःला त्यांत गुरफटून बसून मनःस्थिती अशांत करत बसतात .

एके दिवशी एका सुप्रसिद्ध गायकाच्या कार्यक्रमाला बायकोबरोबर अभिजात जातात - त्यांनी गायलेली गज़ल - " कौन है हम आये है कहांसे " ऐकून आणि नंतर त्यांच्याशी   झालेल्या गप्पातून अभिजातचा  जगाकडे पाहायचा दृष्टिकोनच बदलतो -

पंडितजींच्या बोलण्यातून अभिजातना जगायचं मर्म कळतं - "आयुष्यात दोनच दिवस सर्वात महत्वाचे - पहिला आपण जन्माला आल्याचा दिवस आणि दुसरा आपण जन्माला का आलो हे जेंव्हा  कळेल तो दिवस !!"

घरी परतताना एकदा एका वृद्ध मजुराला हातगाडी ओढायला त्रास होताना बघून त्याला मदत करताना अभिजातना त्या हातगाडीवाल्याकडून जगायचं सूत्र मिळतं - मरण्याचा दिवस देवानं ठरवायचा, तोपर्यंत आपलं कर्म करत रहायचं

मग मृत्यूची वाट पहात का जगायचं -  जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत , नवी आव्हाने घेत का जगू नये ? - हा विचार अभिजातना पटतो

बायको आपलं जाणं कसं सहन करेल, काय म्हणून आठवेल... फक्त चिडचिड करणारा आजारी त्रासिक नवरा? आपलं आयुष्य आपणंच नियंत्रित ठेवायचं, आकाश हजारो मार्ग दाखवेल . भिती सोडायची आणि आपणच आपल्यावर घातलेली बंधंनं तोडायची - असं अभिजात ठरवतात.

आणि आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरु होतो –

या नवीन प्रवासाची दिशा दाखवण्यासाठीच का काय  - " अँब्युलन्स न मिळाल्यामुळे एकाचा मृत्यू " एक बातमी टीव्हीवर  येते आणि आपल्या कारचे रूपांतर अँब्युलन्समध्ये करून गरजू लोकांना सर्व्हिस देण्याची जाहिरात अनेक माध्यमातून अभिजात पसरवतात आणि ते काम सुरूही करतात .

 आपली दुःखं  उगाळत बसताना बायकोच्या अनेक आवडी निवडी , छंद आपल्याकडून दुर्लक्षित झाले - ते पुरवण्यासाठी ही अभिजात प्रयत्न करू लागतात

या नवीन प्रवासात बायको लता साथ देते का ? अभिजातच्या प्रकृतीचे काय - त्यांचे रिपोर्ट्स सुधारतात का ? आपली आठवण  काढतील अशी माणसं अभिजातना मिळतात का ? परदेशातला त्यांचा मुलगा त्यांना या प्रवासात कुठे भेटतो का नाही ? अभिनय करायची अभिजातची सुप्त इच्छा पूर्ण होते का ? या प्रश्नांची उत्तरंही सिनेमा देतो .

अशोक सराफांनी अभिजात इनामदारांच्या भूमिकेत जान ओतलीये - नेहेमीची विनोदी हलकी फुलकी भूमिका नसतानाही एका करुण चित्राला  आनंदी झालर लावायचा त्यांचा प्रयत्न प्रशंसनीय . पद्मिनी कोल्हापुरे अभिजातच्या पत्नीच्या भूमिकेत फार  समजुतीने काम केलंय - त्या वयाने थोड्या लहान वाटतात पण अभिनयाच्या जोरावर त्यांनी हा फरक जाणवून दिलेला नाही.  मराठी सिनेमात अनेक दिवसांनी काम करताना अवघडल्यासारख्या वाटल्या नाहीत हेही विशेष. डॉक्टरच्या भूमिकेत विक्रम गोखले सहज वावरलेत . शशांक उदापूरकर अभिजात- लताच्या मुलाच्या भूमिकेत मोठे वाटतात . आणि त्यांनी फक्त दिग्दर्शकच म्हणून काम पाहिलं असतं तरी चाललं असतं. एका छोटया कॅमिओ रोल मध्ये श्रेयस तळपदे भाव खाऊन जातो .

आनंदाच्या प्रवासावर विश्वास ठेवायला सांगणारी गोष्ट सांगणारा हा चित्रपट असला, तरी अनेकांना तो सॅडीस्ट वाटू शकतो आणि कथानक बराच वेळ तिथल्या  तिथे फिरत राहिल्यामुळे काहीसा संथपणा नक्कीच जाणवतो. पण अशोकमामांच्या चाहत्यांनी त्यांचं एक वेगळं रूप पाहण्यासाठी आणि पद्मिनी कोल्हापूरेच्या फॅन्सनी तिचं  मराठी रूप पहाण्यासाठी हा प्रवास करायला  हरकत नाही .. सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (अमॅझॉन प्राईम व्हिडीओ वर) आहे त्यामुळे हा प्रवास टप्प्याटप्प्याने ही पाहता येऊ शकेल.

खरंच - शेष आहे ते विशेष आहे - आपली दुःखं, आजार, आजारपण यात कुढत आयुष्य रडतखडत जगायचं, का हसतखेळत वेदनांवर मात  करत.

आजार एक वेळ औषधाने बरा  होईल पण आजारपण दूर करण्यासाठी मनाची शक्तीच उपयोगी पडते - मग ती  भक्ती असेल किंवा कर्मावरील  विश्वास. . मनातील आंतरिक सकारात्मक ऊर्जा ही कधी कधी औषधाऐवढीच प्रभावी ठरू शकते.

आज करोनाच्या विळख्यात सर्व जग अडकलंय - प्रत्येक जण आपल्यापरीने काळजी घेतोय -
डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वच, पोलीस- अन्य शासकीय अधिकारी , सफाई कामगार , अत्यावश्यक सेवेत  कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या लढाईत लढत आहेत . अनेक जण वैयक्तिक रित्या , अनेक सामाजिक संस्था करोना पीडितांसाठी आपापल्या परीने मोठा हातभार लावतायत. अनेक लहान मोठ्या व्यक्तींनी ही लढाई लढताना आपले प्राण ही गमावलेत - म्हणून बाकीच्यांनी काम थांबवलेले  नाही. अशा लढाईत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या काम करता आलं तर  छानच -पण  नाहीतर कमीत कमी आपल्या स्वतःची - आपल्या जवळच्यांची मनस्थिती आनंदी ठेवून जगता आलं  - काही चांगलं काम करता आलं तर काय हरकत आहे ?

हा सिनेमा पाहताना मला माझा आवडता सिनेमा  आठवला -राजेश खन्ना , अमिताभचा "आनंद - त्यातले काही संवाद , गाणी मनात घर करून बसली आहेत   - " हम  आनेवाले गमको खीचतान कर आज की ख़ुशी पे ले आते है - और आज की खुशीमे जहर घोल देते है " - " जब तक  जिंदा हूँ , तब  तक  मरा  नहीं - जब  मर गया तों साला मै  ही नहीं "

मरण हे अंतिम सत्य आहे , पण ते एकदाच येणार आहे - जीवन येणाऱ्या प्रत्येक क्षणात आहे , आनंदानं जगावं - आनंद पसरवत जगावं हा मेसेज हा      "प्रवास" नक्कीच देतो.

अभिराम- लता इनामदारांचा  हा "प्रवास" पहा किंवा पाहू नका - पण आपला स्वतःचा प्रवास आनंदी नक्कीच करू या.

जिंदगी के सफर में गुजर जाते है वो मकाम... वो फिर नहीं आते ...वो फिर नहीं आते ..

तो खूब जियो - खुलके जियो

मजेत प्रवास करा

 
©राहुल लाळे

Comments

  1. मस्त परिक्षण !! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे जितकं पटकन उमजेल तितकं बरं

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका