इक दीवाना था...चिंटू
*इक दिवाना था… चिंटू*
राहुल लाळे
श्री ग णे शा य न म हा ..
हमने तुमको देखा
तुमने हमको देखा
कैसे
हम तुम सनम सातो जनम
मिलते रहे है हो जैसे
जेंव्हापासून गाण्याच्या भेंड्या खेळतोय तेंव्हा सुरवातीचं गाणं कोणी म्हणायचं आणि अक्षर कुठलं हे ठरवण्यासाठी आणि खेळाचा श्रीगणेशा करायला ... अक्षर तर 'ह' च आणि माझ्यावर आलं की हमखास मी " हमने तुमको देखा " याच गाण्याने अजूनही सुरवात करतो… तसं 'ह' नी " हम-तुम एक कमरे में बंद हो " हेही म्हणलं जायचं - आणि फाऊल मिळायचा - तेंव्हा गाण्याचा अर्थही कळायचा नाही - कुठला सिनेमा - कोणावर चित्रित झालंय - गायक -संगीतकार -गीतकार कोण ? हे काही माहित नव्हतं - म्हणायला छान वाटायचं. माझा काका तर " ये तो हो ना ही था " मस्त झोकात म्हणायचा. असंच काहीसं खुल्लम खुलला प्यार करेंगे हम दोनो - एक मै और एक तू - मै शायर तो नहीं या गाण्यांबाबतीत. घराजवळच वसंत टॉकीज होतं - तिथली सरगमची ऋषीकपूरची डफली वाजवतानाची व जयाप्रदाची नृत्यअदाकारीची पोस्टर्स पाहून अरे आपण जी गाणी ऐकत होतो ती सिनेमात यानीच म्हणलीत हे कळालं आणि तो सिनेमा पाहिल्यावर तर त्यातला याचा एका मुक्या मुलीला नृत्यांगना होण्यास मदत करणारा आणि मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करून तिचा आदर करणारा डफलीवाला फारच आवडला - आणि नंतरही अनेक सिनेमांत तो आवडतंच गेला - याही सिनेमातली ‘ रामजी की निकली सवारी , डफलीवाले , हम तो चले परदेस- परबत के उसपार’ ही गाणीही तोंडात बसली . सातवीत असताना वाड्यातल्या मित्रांबरोबर मंगलाला कर्ज पाहिला आणि " मेरी उमरके नौजवानो - दिल ना लगाना ऐ दिवानो " हे गाणं ऐकून आमच्यातला नौजवान जागा तर झाला पण ते दिल लगाना वगैरे काही कळालं नाही - त्यातली पैसा ओ पैसा ,दर्द ए दिल, मै सोला बरसकी , इक हसीना थी या गाण्यांनी आणि कर्जच्या त्या गिटारच्या फेमस ट्यूनने धमाल उडवून दिली. अजूनही ती गाणी आणि ती ट्यून मनात घर करून राहिली आहे. रवीवर्मा आणि त्याचा आत्मा घेऊन आलेला मॉन्टी कपूर आणि ओम शांती ओम अजूनही मनात थिरकतोय - शाहरुखला या काळात ओम शांती रीपिट करायचा मोह झाला , हे चिंटूचंच यश
कळायला लागल्यापासून पाहून आणि सिनेमे पाहायला लागल्यापासून आवडता हिरो म्हणजे अमिताभ - अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर ( शोले-दिवार अगदी लहान असताना पाहिलेले ) , नसीब, नटवरलाल, त्रिशूल, डॉन , कालिया , काला पत्थर अनेक पिक्चर आले - अमिताभ तर होताच पण तत्कालीन शशी कपूर , संजीव कुमार , विनोद खन्ना , शत्रुघ्न सिन्हा , राजेश खन्ना , राकेश रोशन , धमेन्द्र- जितेंद्र यासारखे स्टार्स आणि अमोल पालेकर, नसरुद्दीन सारख्या अभिनेत्यांच्या मांदियाळीत चिंटू आपली रोमँटिक इमेज जपत पण काहीशी विद्रोही अभिनयाने आपली जागा अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे दामिनी , बोल राधा बोल, दिवाना पर्यंत टिकवून होता .
कुठलीही वेगळी लकब नाही , कुठलाही एक शिक्का नाही ( रोमँटिक सोडून ) तरी वरील दिग्गजांबरोबर काम करून स्वतःच वेगळं स्थान बनवू शकला - अमर अकबर अँथनी मधला अकबर - अमर आणि अँथनी प्रमाणे मारधाड करत नाही - पण जेव्हा 'परदा है परदा है' म्हणत नितु सिंगला भर थेटरात गुलाब स्वीकारायला मजबूर करतो आणि शिर्डीवाले साईबाबांना साद घालत निरुपा रॉयला संकटातून वाचवतो तेंव्हाही तो त्या तगड्या हिरोंपुढे कुठंही कमी पडला नाही . तीच गोष्ट नसीब मध्ये- कॉलेजमध्ये मुलींच्या विरुद्ध ' हुतूतू ' खेळतो पण दारूत झिंगलेल्या अमिताभची स्ट्रीट फाईट स्वतः लढून नंतर ' चल मेरे भाई ' म्हणत घरी नेताना तो लक्षात रहातोच .
त्याचे अनेक सिनेमे - बॉबी , दुसरा आदमी , बदलते रिश्ते, हम किसीसे कमी नहीं ,ये वादा रहा , रफ़ू चक्कर, खेल खेल मे , धनदौलत, जहरीला इन्सान, प्रेमरोग , जमाने को दिखाना है , झूठा कहीं का आणि अनेक सिनेमे टीव्हीवरच पाहिले –त्याच्यावरती खरंच अन्याय आहे - पण त्याला कारण होतं - त्यावेळचा मिळणारा लिमिटेड पॉकेटमनी - तो सगळा बच्चनवर खर्च व्हायचा ... ( बच्चनची आणि त्याची मैत्री होती - अनेक सिनेमे एकत्र केले - अगदी नातं ही होतं त्यांचं - पण अमिताभ त्याच्या कोस्टार ला कधीच क्रेडिट देत नाही हे स्पष्टपणे बोलणारा ऋषींच आणि अमिताभचं जंजीरसाठी मिळू शकणार फिल्मफेअर अवॊर्ड बॉबीसाठी विकत घेतलं हे बिनधास्त आणि प्रांजळपणे कबूल करणाराही तोच - हा बिनधास्त आणि मोकळेपणा त्याने शेवटपर्यंत ठेवला )
आणि तसंही ते सारे सिनेमे ८०च्या आधीचे म्हणजे थिएटरमध्ये एकटा किंवा मित्रांबरोबर जाऊन पाहायच्या वयाच्या आधीचे. पण अकरावीत असताना सागर आला आणि डिम्पल परत येणार आणि तीही ऋषीबरोबर म्हणून मुद्दाम नटराजला बाल्कनीत जाऊन पहिला - ४ वेळा - आणि त्याआधी बॉबीही पाहून घेतला - काय गाणी सागर मधली - चेहरा है या चाँद खिला है, सागर किनारे दिल ये पुकारे , जाने दो ना - आणि कमाल हसन बरोबरची जुगलबंदी - कुठंही कमी पडला नाही - आणि किशोरचा त्याला मिळालेला आवाज - काय बात है ...
पण ही सर्व कसर नंतर भरून काढली फक्त ऋषीसाठी आणि त्यातल्या गाण्यांसाठी त्याचे आधीचे सर्व सिनेमे परत परत पाहिले - काय सॉल्लिड गाणी –
गाणीही काय एकाहून एक पट्ठ्याने सादर केलीत पडद्यावर -
कधी 'एक कमरेमे बंद हो' म्हणतो - तर कधी 'चल कहीं दूर निकल जाये' .
'सागर जैसी आँखोंवाली' ला नाव विचारताना 'आंखोमे काजल है' हेही पाहून घेतो. 'बचना ऐ हसीनो ' म्हणून ललनांना सावधान करतानाच ' नजरो से कह दो ' म्हणत ' इष्क मेरा बन्दगी है ' भावनेने 'मिलने का मौसम' त्यांना आठवून देतो . ' ओ मेरी चांदनी ' आणि ‘आ दिल क्या मेहफिल मे तेरे' अशी आपल्या प्रियेला साद घालत भरी महफिलमें ' परदा है परदा' म्हणत तिला चेहऱ्यावरचा बुरखा उचलायला भाग पाडताना तिच्या वडलांना 'तय्यबअली प्यार का दुश्मन' म्हणून जागा दाखवून द्यायला त्यानं मागे पुढं पाहिलं नाही.
'जान मेरी रुठ गयी' म्हणत रुसलेल्या प्रेयसीकडे पाहून 'मेरी किस्मत मी तू नहीं शायद' म्हणून तो नाराज झाला तरी त्याची उदासी फार काळ कधी टिकलीच नाही. 'जीना क्या अजी प्यार बीना ' हे जाणत 'दिल लेना खेल है दिलदार का ' हा ऍटीट्युड न सोडता 'तुमको मेरे दिलने पुकारा है ' असं तिला आर्जवत ' होगा तुमसे प्यारा कौन' हे तिला पटवून त्यानी कायमच पटवून दिलं . कधीतरी तर त्याने दर्ग्यावर जाऊन 'तेरे दर पे आया हूँ' करत मन्नतही मागितली होती आणि ते पहात पहात आमच्यासारखे कितीतरी " दिवाना " होऊन ' किसी पे दिल अगर आ जाये तो ' म्हणून आपलं दिल आपल्या हातात घेऊन ' तू तू है वही.... ये वादा रहा' म्हणत प्रेमाच्या आणाभाका घेतच राहिले.. कधीही प्रेमिका डोळ्यांसमोरून दूर झाली तर ' ओ हंसिनी कहां उड चली' म्हणून घायाळ होणारा लगेच 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं' गुणगुणायला लागायचा. आणि नजरेसमोर ती येताच तिच्या चेहऱ्यावरून त्याची नजर ढळत नाही आणि ' तेरे चेहरे से नजर नहीं हटती ' असं भुलावंत, ''तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं ' म्हणून तिला मनवत ' तू तू तू तू तू तारा' चालू करणं हे म्हणजे याच्या बाये हाथ का खेल कायमच राहिला.
कधी कधी हाही आपल्या प्रेमिकेवर लटक्या रागाने ' सोचेंगे तुम्हे प्यार करेके नहीं' म्हणायचा खरा पण लगेचच दोघेही एकमेकांना 'गवाह है गवाह है " अशा 'चांद तारे' यांच्या शपथा देत ' तेरे मेरे होटोंपे मीठे मीठे गीत मितवा " अशी प्रेमगीते आपल्या प्रेमिकेबरोबर गात हा दिवाना आयुष्यभर 'प्रेमरोगीच' राहिला.
त्याला सुरुवातीला शैलेंद्रसिंह , नंतर किशोरकुमार , रफी , सुरेश वाडकरपासून अगदी कुमार सानूनेही आवाज देत या सगळ्या गाण्यांत साथ केली . ही सगळी गाणी गाताना पडद्यावर अनेक वाद्यही तो लीलया वाजवता दिसायचा कधी व्हायोलिन, कधी गिटार , कधी डफली - कधी अकोर्डीअन तर कधी पियानो आणि क्लॅरोनेट ही आणि त्याचा आविर्भाव असा असायचा की ही सगळी वाद्यं त्याची जणू खेळणीच. आणि या गाण्यांत त्याच्याबरोबर डिंपल, मौसमी , पद्मिनी, टीना , रीना, पूनम , रंजिता , झीनत, काजल, किम ,राखी पासून अगदी जुही, जयाप्रदा,श्रीदेवी, राधिका, मीनाक्षीच काय अगदी दिव्या भारतीने सुद्धा प्रेमिकेच्या भूमिका केल्या आणि कोणापुढेही तो ऑड वाटला नाही . आणि जीवनसाथी नीतुसिंगबरोबर तर विचारायलाच नको .
नुसता एक रोमँटिक हिरो नाही तर एक चांगला मित्र, भाऊ , मुलगा म्हणूनही तो पडद्यावर चमकतच राहिला. ते करताना ही त्याला झकास गाणी मिळाली - सागर मधलं 'युही गाते रहो ' असेल किंवा आप के दिवाने मधलं ' तुमको खुश देखकर मैं बहोत खुश हुआ ' असेल
अनेक नायक आले गेले पण त्याने त्याची जागा अजिबात सोडली नाही . वडलांमुळे सिनेमात जरी प्रवेश त्याने केला असला तरी तसंच करणाऱ्या त्याच्या भावांप्रमाणे तो हिंदी चित्रपट सृष्टीतून तो बाहेर फेकला गेला नाही ते त्याच्या सहज अभिनयामुळे .
अगदी रोमँटिक भूमिकेतून बाहेर पडला तरी त्याने रोमँटिसिजम नाही सोडला . परवा हम-तुम परत पाहिला त्यात तीस वर्षांनंतरही ' मैं शायर तो नहीं ' तेवढ्याच रुमानी स्टाईलमध्ये गाताना दिसला. नव्या इनिंगमध्ये त्याने नवा अवतारही धारण केला - अग्निपथ मधला अंगावर काटा आणणारा रौफलाला आणि औरंगजेब मधला सत्ता आणि संपत्ती जमा करून साम्राज्य बनवणारा आणि अंगावर आल्यावर आपल्या जावयाचा थंड डोक्याने खून करणाऱ्या पोलीस सुपिरिटेंडंट रवीकांतचा रोल करून त्याने आपली रेंज दाखवून दिली. कपूर & सन्स आणि १०२ आऊट मध्ये मध्ये वेगळ्याच रूपात दिसला.
कपूर घराण्यातला बिनधास्त मोकळेपणा आणि मिजास ऋषींकडे होतीच - त्याबरोबर काकाप्रमाणे ( शम्मीकपूर) तो IT- सोशल मीडियावर ही अनेक विषयांवर स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करत तो आपली जागरूकता जपून होता
गेली दोन वर्ष कॅन्सरशी झगडत असतानाही त्याने आपली दिलदारी हॉस्पिटलमधूनही पोस्ट शेअर करत जपली
इरफान खान पाठोपाठ आमच्या लाडक्या चिंटूनेही काल एक्झिट घेतली - विश्वासच बसला नाही
'मैं शायर तो नहीं' म्हणत आम्हाला शायरी शिकवून गेलेला हा हरहुन्नरी दिवाना आता नवीन रोल मध्ये दिसणार नाही ... पण 'इक दीवानां था ' ची ट्यून ऐकत त्याची गाणी गुणगुणत आम्ही त्या शिकवलेल्या शायरीचे 'कर्ज ' नक्कीच चुकवत राहू...
जीवन के दिन छोटे सही .. हम भी बडे दिलवाले ... कल की हमें फुरसत कहाँ ...
फुरसत मिळणार नाही कदाचित पण आम्हीही दिलवाले आहोत ... वेळात वेळ काढून आम्ही त्याचा संदेश ऐकत राहू..
अपने यहीं चार पल है...
आगे है क्या किसने जाना
जीना जिसे आता है वो
इन मे ही मौज मना ले...
जीवन के दिन छोटे सही
हम है बडे दिलवाले...
©राहुल लाळे
०२-०५-२०२०

Comments
Post a Comment