थप्पड


*थप्पड़*

एक थप्पड़ ... बस एवढंच ? ... त्यात काय एवढं ?
राहुल लाळे

हाँ मैंने अपने आँचल का अम्बर बनाया है।
के कहीं गर मेरा रास्ता,
चाहतों से अलग जो चले।
के कहीं गर मेरे सीने में,
साँस थोड़ी भी जो कम पड़े,
मेरा अपना भी इक आसमाँ हो,
ख़ुद को हर इक दिशा में बिखेरु
मुझको हर एक दिशा से बुलाना
मैं  अगर फिरसे मिल भी जाऊं
मुझे पाश में  भींच  लेना
मगर मेरे आसमान को
तहा  कर मुझे सौप देना ,
ताकी तेरा भी एक आसमा हो
और मेरा भी एक आसमा हो
और मेरा भी एक आसमा हो

किती छान कविता आहे ही अनुभव सिन्हाची ... परवा त्याचा तापसी पन्नू अभिनित "थप्पड़ "   पाहिला - त्यातली अमृताच्या  ( तापसी) वडलांनी ( कुमुद मिश्रा )  सिनेमात  तिला धीर देताना त्यांनी  म्हणलेली त्यांना आवडत असणारी ही कविता . किती स्वप्नवत जगतात वाढतात मुली - त्यांनाही आकाशाला गवसणी घालायचे वेध असतात " आज मैं  उपर , आसमा  नीचे " म्हणत नवनवी स्वप्नं लहानपणापासून  पाहतात - इतर सर्वसामान्यांसारखी डॉक्टर , इंजिनियर - वकील होण्याबरोबरच कुणा  एकीला मोठी अभिनेत्री बनायचं असतं , तर कुणाला मॉडेल -कुणाला  कवयित्री -लेखिका व्हायचं असतं . आणि आपल्या महत्वाकांक्षा , करिअर सांभाळताना संसाराची गाडी ओढायची तारेवरची कसरतही  तिला करायची असते
पण  आयुष्याच्या एक अवघड आणि निर्णायक टप्प्यावर  जेंव्हा मोठी नृत्यांगना होण्याचं स्वप्न बाळगणारी सिनेमाची नायिका, अमृता (तापसी ) म्हणते " मी हाऊस वाईफ - होम मेकर होईन असं स्वप्नं कधीच पाहिलं नव्हतं - पण आनंदानं , नवऱ्याशी संसाराशी समरस मी झाले ना ... मग?.... "  ,  " हे मग " - म्हणजे फक्त एकच थप्पड़  ती का  सहन करू शकत नाही आणि हे फक्त एकंच थप्पड़  खाल्ल्यावर तिला का उमजते हे पहाण्यासाठी तरी थप्पड़ पाहायला हवा

आपण कुणाला आयुष्यात कधी एखादी थप्पड मारली असेल, किंवा कुणाकडून खाल्लीही असेल ... मारल्यावर कधी सॉरी म्हणलं असेल किंवा ऎकलंही  असेल . आणि कदाचित ती थप्पड विसरूनही गेलो असू . किंवा त्या माणसाबद्दल आपल्या मनात अढी  बसली असेल आणि बराच काळ ती राहिली ही असेल.

पण अशीच एखादी थप्पड़ एखादं  आयुष्य - त्याचं  भावविश्व  - एखादा संसार  उधळू शकते ?- संबंधित कुटुंबिय , मित्रपरिवार -शेजारी , व्यावसायिक संबंध  यांच्यावरही किती खोल मानसिक आणि वैचारिक परिणाम यामुळे होऊ शकतो - आणि थप्पड खाणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर - करावं तिनं  सहन - कारण " घर जरुरी है "  आणि घर -संसार टिकवणं ही स्त्रीचीच जबाबदारी - मग मारली नवऱ्यानं एक थप्पड़  - काय बिघडलं ? असं आई, सासू, भाऊ एवढंच  काय तर तिची एक  प्रतिष्ठित पण स्वतःचीच ओळख शोधणारी वकील ( हो ती एक स्त्रीच ) सांगते - तेंव्हा त्या थप्पड़  खाल्लेल्या स्त्रीची मनस्थिती काय होत असेल ? या थपडेचा एका  स्त्री बरोबरच  कोणाही व्यक्तीच्या मानसिकतेवर काय परिणाम होऊ शकतो आणि एका पारंपरिक विचारसरणीच्या धारणेवर  एक जोरदार चपराक बसते, हे हा सिनेमा दाखवतो.

सिनेमात तापसी आहे हे ट्रेलर मध्ये पहिले होते आणि विषयही साधारण माहित होता म्हणून सुरुवातीला  टायटल्स नंतर जी पात्रे  डोळ्यासमोर येतात ती  पाहून आपण बुचकळ्यात पडतो पण हळू हळू कथानकात शिरल्यावर त्या पात्रांचा एकमेकांशी आणि मूळ विषयाशी असलेला संदर्भ लक्षात येतो . कथेची आणि नातेसंबंधांची गुंफण दिग्दर्शकाने फार सहज नैसर्गिकरित्या केली आहे. आपल्या दररोजच्या रुटीनमधल्या पेपरवाला, दूधवाला , आलं  किसून - गवती चहा घालून सकाळचा चहा बनवणं या गोष्टी नायिकेला करताना पाहून आपणही हळूच त्या कथेचा भाग होऊन जातो.

नृत्यांगना बनण्याचं स्वप्नं  बाळगत असतानाच साधा पराठाही बनवता न येणाऱ्या अमृताचं  विक्रमशी  (पावल गुलाटी ) लग्न होतं आणि घरातला बिझिनेस सोडून स्वतःची आयडेंटिटी बनवू पाहणाऱ्या नवऱ्याची आणि नवऱ्याशी भांडून यांच्याबरोबर राहणाऱ्या मधुमेही सासूची  (तन्वी आझमी ) सर्व खातरदारी  करण्यात ती सकाळी उठल्यापासून झटते . कामवालीशी तिच्या नवऱ्याबरोबर झालेल्या भांडणाबद्दल बोलताना तिच्याकडून आणि सासूकडून स्वैपाक शिकायचा प्रयत्न करते . चहा पिताना झाडांना पाणी घालताना शेजारणी बरोबर 'हाय हॅलो' करते . सकाळी घाईघाईने कामावर निघालेल्या विक्रमला डबा - रुमाल, पाकीट गाडीपर्यंत आणून देते. दररोजचे हे प्रसंग परिस्थितीप्रमाणे कसे बदलतात - हे कथा पुढे सरकताना परत-परत का दाखवलेत ते कळते. सकाळच्या वेळेला निघणारी रोज दिसणारी शेजारीण सारखी गाडी बदलते ...ती करते तरी काय ? हा विक्रमला पडणारा प्रश्नही टिपिकल पुरुषी अहंकार दाखवणारा आणि अमृताने त्याला दिलेले " मेहनत " हे उत्तरही तेवढंच समर्पक .


ऑफिसमधील चांगल्या कामामुळे विक्रमला  त्याच्या ऑफिसच्या लंडन ऑफिसचा हेड बनून येणारा  मौका आणि त्यासाठी या दोघांबरोबरच दोन्ही घरातल्या लोकांची एकसाईटमेन्ट आणि पुढचे प्लॅन्स हेही प्रसंग छान रंगवलेत .

लंडनला जायचं ठरल्यावर त्या आनंदाप्रीत्यर्थ विक्रमनं  घरात आयोजलेल्या पार्टीत ऐनवेळेला आपल्याला अन्यायकारकरित्या तिथं दुय्यम स्थान मिळणार आहे असं कळणं आणि त्यावरून त्याची होणारी चिडचिड व ऐन पार्टीत बॉसबरोबर भांडण आणि ते सोडवायला गेलेल्या अमृताला अचानक विक्रमकडून थप्पड बसणं हा या सिनेमाचा टर्निंग पॉईंट. तसं  पाहिलं तर ती काही तिला मुद्दाम मारलेली थप्पड नसते  - त्या आधीच्या बॉस बरोबरच्या भांडणात - चर्चेत ती कुठं फ्रेम मध्येही नसते पण अचानक सर्वांसमोर पडलेल्या त्या थपडेने नायिकेचं विश्वंच बदलून जातं . तिच्या आत्मसन्मानालाच ठेच लागते . ती बोलत  काहीच  नाही पण दोन दिवस नवऱ्यालाही आपण काही चुकीचं केलंय  असं वाटत  नाही अन मग त्याच्यावरचा विश्वास जाऊन  नायिका माहेरी निघून जाते. ती तिच्या परत न येण्याच्या निर्णयावर ठाम आहे हे कळाल्यावर मग कायेदशीर लढाई चालू होते . त्यात मग काय आरोप - प्रत्यारोप होतात - त्यात नायिका प्रेग्नन्ट आहे हे कळते - कोर्टापर्यंत गोष्ट जाते का ? दोन्ही बाजू स्वतःची बाजू कशी  मांडतात हे सर्व पडद्यावरच पहाणं  योग्य .

नवऱ्याबरोबर वाद झाल्याने मुलगा आणि सुनेबरोबरोबर राहणारी नायिकेची  सासू , घर वाचवणं आणि चालवणं ही घरातल्या स्त्रीचीच जबाबदारी आहे असं मानणारी आई, ओपन माईंडेड होणारी भावजय , शेजारील अपार्टमेंटमधील  स्वतःच्या एकुलत्या एक  मुलीबरोबर राहणारी तरुण कमावती विधवा , नवऱ्याच्या  हातचा मार  खाणारी व सासूशी भांडणं  होत राहणारी सतत घरातली कामवाली, प्रतिष्ठित नवऱ्याची आणि माजी मोठ्या वकिलाची सून असलेली आणि नवऱ्याकडून प्रेम आणि स्वतःची ओळख निर्माण करायला धडपणारी एक वकील ..या सर्व   सिनेमातल्या  कथेतील नायिकेच्या समांतर प्रवाहातील स्त्रिया. त्यातली वकील सोडली तर बाकीच्या सर्व तिच्या रोजच्या आयुष्यातल्याच. या सर्वांच्या त्या स्वतः स्त्रिया असूनही  या घटनेकडे पाहायचा वेगवेगळा दृष्टिकोनही डोळे उघडवणारा आहे. त्यांची - विशेष करून आई, सासू आणि वकील यांची  या प्रकरणातली आधीची भूमिका आणि नंतर पडत गेलेला  बदल फार छान चित्रीत केला आहे . एक बाई आपल्या नवऱ्याशी पटत नाही म्हणून घर सोडते आणि सुनेने मात्र नवऱ्याची थप्पड विसरून संसार टिकवावा अशी अपेक्षा ठेवते आणि नंतर सुनेची भूमिका पटल्यावर समंजसपणा दाखवते - हे तन्वी आझमीने सहज सादर केलंय . घर टिकवणं हे बाईचंच कर्तव्य आहे - मग फक्त एक थप्पड़  खाल्ल्यावर लगेच घटस्फोट घ्यायचा असं म्हणणारी आई नंतर स्वतःच्याच मुलाचं त्याच्या होणाऱ्या बायकोशी उडालेल्या खटक्यातून भानावर येणं  आणि मुलीची भूमिका समजणं हे दाखवताना रत्ना पाठक-शाह घराघरातल्या आईचं चित्र उभं करतात. भावाच्या मित्राची बायको झालेल्या  अभिनेत्रीने तसंच  कामवालीचं काम केलेल्या नटीने  छान काम केलंय.  त्यांचा अभिनिवेश आणि  एक्सेप्रेशन्स फारच छान . दिया मिर्झानंही शेजारी राहणाऱ्या आणि अमृताची मनस्थिती ओळखणाऱ्या एका सहृदयी स्त्रीचं काम नेटकं केलंय. महिला वकिलाचं काम केलेल्या माया सरावनेही नावाजलेल्या  वकिलाची  सून आणि  प्रतिष्ठित नवऱ्याच्या छायेखाली राहून आपलं अस्तित्व शोधणाऱ्या एका स्त्रीचं केलेलं काम झकास. ती जेव्हा विक्रमच्या वकिलाशी (राम कपूर)  त्वेषानं बोलते तेव्हा तो तिला वकिली सोडून ऍक्टिव्हिस्ट झालीस असं उपहासाने म्हणतो तेव्हाचं  अमृता - तापसीचं " वकील होतीच आता ती स्त्री झालीय " हा डायलॉग टाळी घेऊन जातो.


सिनेमातले इतर संवाद ही  मनाला भिडतात.   " रिश्ते बनाने मे वक्त नहीं लगता लेकिन निभाने में लगता हैं - रिश्ते को जोडकर  रखना चाहिये " असा सल्ला ऐकल्यावर " जोडना है इसका मतलब कुछ टुटा तो है " हे उत्तराचं  वाक्य काळजात घर करतं . आपली स्वप्ने, आवडी निवडी  विसरून लंडनच्या घराचं थीम नवऱ्याच्या आवडत्या निळ्या रंगात करायचं प्लॅनिंग करणाऱ्या (स्वतःचा आवडता रंग पिवळा असूनही) अमृताला नात्यात प्रेमाबरोबर काय हवंय तर respect - आत्मसन्मान आणि happiness - आनंद - पण ऑफिसच्या कामामधल्या  आपल्या  इमोशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा कितीतरी पट इमोशन्स आपलया संसारात  इन्व्हेस्ट केलेली आपली पत्नी विक्रमला दिसत नाही आणि थप्पड मारल्याला  एक रागात होऊन गेलेली घटना समजणाऱ्या  त्या नवऱ्याबद्दल  नायिकेला मग प्रेम का वाटावं ? 

समाजात किती विषमता असते ना..  एकीकडे  "रागाच्या भरात एखादी थप्पड मारली तर काय होतं ?.. थोडी बहुत मारपीट तो प्यार ही हैं ना? " अशी मानसिकता असलेले नवऱ्याचे मित्र-वकील-नातेवाईक, आधी नायिका घरी परत यावं म्हणून आणि नंतर  मुलाचा ताबा मिळून घटस्फोट मिळवण्यासाठी खोटंनाटं कुंभाड रचणाऱ्यांचा  एक समूह , तर दुसरीकडे आत्मसन्मानाला धक्का पोचून  "नहीं  मार सकता " असा पवित्रा घेतल्यावर आपण करतोय ते बरोबर आहे ना अश्या शंकेला " हम सही करनेकी सोचते हैं , लेकिन कई बार सही करने से हॅप्पी नहीं  होते " असे म्हणणारे वडील आणि साथ देणारा स्त्रीवर्ग . वडलांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा एकदम सही - मुलीला साथ देतानाच आपल्याकडून आपण आपल्या पत्नीवर अन्याय केलेला नाही हे खात्री असणारा पण तिच्याही मनाविरुद्ध काहीतरी घडले आहे हे कळल्यावर खंतावणारा प्रेमळ नवरा - कणखर पण मायाळू बाप त्यांनी खासच रंगवलाय . नायिकेला थप्पड लगावणारा नवरा पावल गुलाटीने नैसर्गिकरित्या वटवला आहे.

सगळ्यात कमाल केलीय तापसी पन्नूने - पडद्यावरचा सहज वावर, चेहऱ्यावरील आणि डोळयातील भाव  आणि पात्रात पूर्णपणे उतरून अभिनय  केल्यामुळे इतर सिनेमांप्रमाणे याही सिनेमात तिचे काम झकासच . अनुभव सिन्हाचा  आर्टिकल १५  पाहिला होता आता मुल्कही पाहणार . 

सिनेमा व्यावसायिकरित्या यशस्वी झाला का नाही हे अलाहिदा पण अनुभव सिन्हाची ही  "थप्पड़" पाहून काही प्रश्न मात्र मनात येतातच –

- वर्षानुवर्षे अज्ञानामुळे आणि आता शिक्षण घेऊनही स्त्री ही पुरुषप्रधान कुटुंब आणि समाजव्यवस्था आणि पुरुषी अहंकारापुढे झुकत आली आहे. पूर्वी  शिक्षण  नव्हतं म्हणून ती घरकामात अडकली - घराबाहेर तर तिला किंमत ही नव्हती - आता शिक्षण झालं म्हणून ती घराबाहेर तर पडली तरीही प्रत्येक बाबतीत नमतं  घेणं - घरकाम करणं - निर्णयप्रक्रियेत भाग नसणं हे काही थांबलं नाही . तिचं आपलं " नाच गं  घुमा " चालूच आहे . उलट मिळालेल्या  शिक्षणामुळे, वाढलेल्या अवेअरनेसमुळे आणि वाढत्या आकांक्षांना घालाव्या लागणाऱ्या लगामामुळे  तिची घुसमट अजूनच वाढतीये . स्त्रियांना शिक्षण मिळालं पण शिकलेल्या स्त्रियांशी किंवा तसंही  बदलत्या जगातल्या स्त्रियांशी कसं  वागायचं याचं शिक्षण कुठल्याही स्तरातल्या पुरुषांना मिळालेलं नाही. आणि अनेक जणांना त्याचं  भानही नाही. ….हे  भान आणून देण्याचं काम ही " थप्पड़ " नक्कीच करते.


- अगदी एखाद्या सुशिक्षित पुरुषालाही एखाद्या स्त्रीचं वर्चस्व सहन होत नाही... तिचं पैसे कमावणंही - स्वतंत्र विचार करणंही...दिया मिर्झाचं सारखं गाडी बदलणं पाहून विक्रम ती नक्की काय करते हे विचारतो, यातून दिग्दर्शक हेच दाखवतो.. याचमुळे मुलगी मागं लागली असतानाही दिया *एफर्टलेस* - ऍडजस्टमेंटशिवाय  जगता यावं म्हणून सिंगल रहाणंच पसंत करते. असं सिंगल, इंडिपेंडंट विचारांची शिकलेली  स्त्री किती पुरुषांना पचनी पडेल . आणि अमृताकडून धडा घेऊन एखादी अशिक्षित बाई पण अन्यायाला विरोध करायला लागली तर तिचे कौतुक करायला , पाठिंबा द्यायला कोण असेल ?

स्त्रियांना गृहीत  धरणं किती वर्ष चालणार ? घरातली कामं  स्त्रीनीच करायची, संसार तिनेच सांभाळायचा, पडती बाजू तिनंच  घ्यायची ( हे जनरलाईज्ड / प्रातिनिधिक आहे - सन्माननीय अपवाद असू शकतात !!!) -  निर्णयात्मक - सृजनशील कामं करण्याचा मक्ता पुरुषाचाच - स्त्री फक्त दैनंदिन रुटीन कामं  करण्यासाठीच ? ..आणि अनेकदा महत्वाची कामं - निर्णय घेऊनसुद्धा ?  बायकोने केलेली साधी नेहमीच्या चवीची कॉफ़ी , खाण्याच्या पदार्थांच्या चवी सवय झाल्यावर  इतर कुणी  केलेल्यात फरक पडला तर तोंड वेंगाडणाऱ्यांना तिचं स्वतःच्या जवळ असणंही आपण काहीही केलं तरी गृहीत धरणं कितपत योग्य आणि किती सहन होणार आता ? अगदी स्त्री  फक्त गृहिणी असली तरी तिच्यावरचा अन्याय एखादा दागिना देऊन दूर होऊ शकेल ?- थपडेनी झालेली वेदना दूर करू शकेल ?


- सिनेमाचा शेवट नेहमीप्रमाणे   गोडगोड करण्याचा मोह दिग्दर्शकाने आणि सहलेखिका मृण्मयी लागूने टाळलाय - अमृता किंवा तिची वकील नेत्रा या ज्या आत्मविश्वासाने आपल्या आयुष्याचा निर्णय घेतात तो पाहून “अर्थ”मधल्या शबाना आझमीची आठवण आल्यावाचून रहात  नाही ( जरी तिथलं तिचं कारण वेगळं असलं तरी ). तसंच एखादी अशिक्षित स्त्री, नायिकेच्या आई आणि सासू , भावजय, कमावती एखादी विधवा - जगातली प्रत्येक स्त्री या सर्वांनाच आनंदी - मनस्वी - स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे - सुरुवातीला दाखवलेली ऑरेन्ज  कांडी हे त्याचंच  प्रतीक आहे का ?

- थप्पड प्रत्यक्ष असो वा शाब्दिक - त्याने जर एखादा सुरळीत चाललेल्या संसारात , आयुष्यात किती वादळं  उभं केलं- अशानं जर घरं मोडणार असतील तर लग्नव्यवस्था कशा टिकतील ? असं अनेक विचारतील - पण मग त्यानं काय होऊ शकेल याची शक्यताही लक्षात नक्कीच घ्यायला हवी - हे सांगण्यात  तापसी पन्नू, अनुभव सिन्हा  आणि मंडळी नक्कीच यशस्वी झाली आहेत. 

स्त्री काय पुरुष काय कोणीच कुणाला गृहीत धरू नये - पुरुषत्व दाखवून स्त्रिच्या  मनाचा ( हो मनच ) सन्मान राखून पुरुषानं तिचं स्त्रीत्व जपावं आणि पुरुषाचं पुरुषत्व मानून स्त्रीनं तिचं  स्त्रीत्व मिरवावं ... 

मग काय... 

दोघेही आयुष्यभर गात राहतील -

जिंदगी मेरे घर आना .. 
तेरे हाथोंमे चेहरा छुपाके  जीना 
तेरे आंगनमे - तेरे दामनमे - तेरी आँखोंमे - तेरी पलकोंमे 
तेरे कदमोमे इसको  बिठाके जीना ... 

जिंदगी मेरे घर आना .. 


 "थप्पड़" पहा आणि "थप्पड"  टाळा !!!

राहुल लाळे 
१२.०३. २०२०

Comments

  1. समीक्षण खूप छान केले आहे,
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. अप्रतिम.... अभ्यासपूर्ण... 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका