पानिपत ...फतेशिकस्त... अगदीच पानिपत नाही..आणि फते ही

 राहुल लाळे

इतिहास हा आवडता विषय , त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकं  वाचण्याचा नाद लहानपणापासून - शिवाजी महाराज , मराठ्यांचा  इतिहास तर जिव्हाळ्याचा  विषय . बाबासाहेब पुरंदऱ्यांची शिवछत्रपतींवरची व्याख्यानमाला कमीत कमी  दहावेळा आणि त्यांचं राजा शिवछत्रपतीं हा ग्रंथ अगणित वेळा वाचलाय अजूनही वाचतो.

लहानपणी टीव्हीवर ( आता का लागत नाहीत ?) भालजी पेंढारकरांचे  शिवकालीन सिनेमे आवर्जून पाहायचो - राजा शिवछत्रपतीं, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मराठा तितुका मिळवावा, थोरातांची कमळा , धन्य ते संताजी धनाजी ... अनेक .. अगदी दादा कोंडकेंचा गनिमी कावा सुद्धा ..


मध्ये अनेक वर्षे ऐतिहासिक सिनेमे निघालेच नाहीत . पण गेल्या काही वर्षात संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांनी हिंदीत आणि नुकतंच  दिगपाल लांजेकर सारख्या नवोदिताने  मराठीत ऐतिहासिक चित्रपट काढायचं धाडस केलंय  - खरंच त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. भन्साळीचा बाजीराव- मस्तानी गाजला पण पाहिला नाही ( बाजीराव  "दुश्मनची वाट लावली" म्हणताना  आणि काशीबाई व मस्तानी एकत्र पिंगा घालताना बघायचं धाडस नाही झालं ), जोधा अकबर ही नाही पाहिला - नंतर टीव्हीवर लागला तेव्हा थोडा  पाहिला - पण सलग पूर्ण बघितला  नाही गेला . त्यामुळे मागच्या आठवड्यात लागलेला    फतेशिकस्त आणि नंतर पानिपत पाहिला.

दोन्ही चित्रपटांबद्दल बरंच काही आधीच लिहून आलंय आणि इतिहास खरा काय होता आणि प्रत्यक्षात सिनेमात काय दाखवलं हेही बहुतेक रसिकांना माहिती झालंआहे, त्यामुळे परत त्यात वेळ घालवत नाही.

दोन्हीही सिनेमे म्हणून आवडले , पण भावले नाहीत... ऐतिहासिक म्हणून मनाला भिडले नाहीत...कारण लहानपणापासून मनात ठसलेले प्रसंग पुर्वीच्या चित्रपटातून जसे सामोरे यायचे, तसे ते हे चित्रपट पहाताना समोर नाही आले. फत्तेशिकस्त पहाताना शाहिस्तेखानावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तयारी, त्यावेळेचे सर्वच प्रसंग पडद्यावर दाखवले आहेत. पण त्यात अनेकदा कृत्रिमता जाणवली. पटापट प्रसंग समोर येतात, कधीतरी ओढूनताणून आणल्यासारखेही, त्यांच्यात कुठे कंटिन्युइटी जाणवली नाही, ठिगळं लावल्यासारखे एका मागे एक प्रसंग येत गेले (पानिपतमधे पण तसेच).  बोलण्यात त्यावेळच्या भाषेचा लहेजा विशेष जाणवला नाही. खानाची बोटे कापायच्या क्लायमॅक्सला थरारनाट्य रंगलंच नाही. जरी प्रेक्षकांना काय होणार  हे माहिती असलं तरी ते नाट्य पडद्यावर रंगलंच पाहिजे. "खानाला कात्रज घाट दाखवायला हवा" हे वाक्य महत्त्वाचे पण संदर्भ सर्वांना कळला असं वाटलं नाही. तसंच "पानिपत" मधला "बचेंगे तो और भी लडेंगे" ही गर्जना. दत्ताजी शिंदेंच्या तोंडच्या या स्फुरक वाक्याने शाळेत भारावून गेलो होतो, तेवढ्या एका वाक्याने पानिपतचे समर लक्षात राहिले होते. पण सिनेमात ते वाक्य  कधी येऊन गेले आणि स्वतः दत्ताजींचा पराक्रम दाखवायला दिग्दर्शकाला वेळच मिळाला नाही. नायक-नायिकेचे (सदाशिवराव भाऊ ,पार्वती) यांचं प्रेम, गाणी दाखवण्यात वेळ खर्च झालाय. ऐतिहासिक चित्रपटात गाणी असायला हरकत नाही पण ती कथेला पुढे नेणारी ,अभिरुचिपूर्ण असावीत.....आठवा...मराठी पाऊल पडते पुढे,.अखेरचा तुला हा दंडवत,  शूर आम्ही सरदार आम्हाला, बाई बाई मन मोराचा, पाहूनी प्यार भरी मुस्कान, इ.... बरंय या सिनेमांत " पिंगा" ,"वाट लावली"असली गाणी नव्हती...

फतेशिकस्त विषयाला धरुन नक्कीच होता..पण कलाकारांचा वावर, सेट , संवाद अकृत्रिम वाटले नाहीत.
पानिपतातल्या सेटवर जोधा अकबरच्या सेट्सची बरीच छाप वाटली...त्यातल्या त्यात दिल्ली-आग्राचे मुघल दरबार. शनिवार वाडाही जमला नाही..

ऐतिहासिक चित्रपटात काम करणारा नट हा पडद्यावर तो सादर करत असलेला कॅरॅक्टर म्हणूनच दिसला पाहिजे.
फतेशिकस्तमध्ये मराठी कलाकारांबरोबरच काही कलाकार हिंदी असूनही  ऐतिहासिक कॅरॅक्टरमध्ये व्यवस्थित शिरले पण तसं पानिपतमधे झालं नाही... अनेक कलाकार मराठी असूनही त्यांना कॅरॅक्टरमध्ये जायला वेळच मिळाला नाही. मुख्य कलाकारांपैकी  अर्जुन कपूर आणि क्रिती सनांनं अपेक्षेपेक्षा छान निभावून नेलंय..पण संजय दत्त पहिल्या प्रसंगात खूंखार अब्दाली म्हणून जसा सादर झाला, तसा पुढील सर्वच प्रसंगात वाटला नाही... अनेकदा तर चोक झाल्यासारखा वाटला...संजूबाबा अब्दाली आहे का अब्दाली संजूबाबा, हा प्रश्नच पडतो.

ऐतिहासिक असला तरी व्यावसायिक सिनेमा असणं आणि व्यावसायिक सिनेमा असला तरी ऐतिहासिक विषय असणं, हा तोल सांभाळला आला तरच तो पटतो.  नवीन ऐतिहासिक सिनेमात बाजारुपणा करून नाही ते प्रसंग, नको असलेली गाणी घालून जी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते , ते टाळलं तर या जमान्यात ही ऐतिहासिक विषयावर सिनेमे बनवण्याचं घेतलेलं धैर्य व कार्य सुफळ संपन्न होईल. (त्यांचं या धाडसाबद्दल कौतुक आहेच)

सिनेमासारख्या प्रभावी माध्यमातून चुकीचा इतिहास आणि चुकीचे संदर्भ पसरु नयेत , उलट रुचीसंपन्न आवड निर्माण व्हावी हीच अपेक्षा

वानगीदाखल ६०-७० वर्षांपूर्वी चित्रित झालेल्या चित्रपटातील हा आपला आवडता सीन पहा..VFX वगैरे टेक्नॉलॉजी नसतानाही साधेपणातही वाचलेला इतिहास जशाचा तसा डोळ्यासमोर उभा रहातो.


https://youtu.be/IcpxgByNgCk

राहुल लाळे






Comments

  1. चांगलं लिहीलं आहेस.

    ऐतिहासिक वगैरे चित्रपटांच्या बाबतीत ज्यांना ती गोष्ट मुळात फारशी माहीत नाही अशांना चित्रपट कसा वाटतो हा मुद्दा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं..
    मराठी माणसांच्या, इतिहासाच्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या आहेत ही एक सर्वसाधारण समाधानकारक नोंद आहे

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिले आहे. सिनेमा ला मर्यादा येतात. तो इतिहास नसतो तर इतिहासाचा घेतलेला आधार असतो. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे.
    प्राचार्य शिवाजीराव भोसले.
    समाजात लेखक, विचारवंत, समीक्षक
    आहेत हे ही नसे थोडके.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका