*खारी बिस्कीट ...सत्यातली स्वप्नं* 
राहुल लाळे

एखादी गोष्ट मनाला मनापासून भावते.. बरेच वेळा ती बालीश, तर्कहीन असते, तरीही. दिग्दर्शक (आणि या सिनेमाचा कथाकार ही) संजय जाधवचा *खारी बिस्किट*   हा सिनेमा असाच भावला. सिनेमा म्हणून काही त्रुटी आहेत पण त्यावर मात करणारा ऐन दिवाळीच्यावेळी भाऊबीजेला आलेल्या भावा बहिणीचा विषय आहे. , कथेत फार दम नाही पण जीवाला हात घालणारा भाव आहे...स्वप्न पहाणं आणि ती सत्यतेत आणण्यासाठी होणारी  खरी धडपड दाखवलीआहे म्हणूनच तो आवडला.

सिनेमाचं नावंच जरा विचित्र आणि आकर्षक - उच्चारताच मनात , डोळ्यासमोर एक चित्र येतं, जीभेला एका चुरचुरीत हवीहवीशी चव येऊ घालते तसंच काहीसं.
आई खारी बिस्किटे विकायची म्हणून नऊ दहा वर्षीचा मुलगा 'बिस्कीट'  आणि छोटीशी गोड बहीण 'खारी'. पण या गोड भावंडांचं आयुष्य आपल्या मुलांसारखं लाडाकोडातलं नाही. खारी जन्मतःच दृष्टिहीन , आईवडलांचं छत्र नाही, झोपडपट्टीत रहाणं असं कष्टदायी. पण धिटुकल्या बिस्किट ने धीर सोडलेला नाही. "जगात काही मिळवण्यासाठी फार लागत नाही, प्रेम पुष्कळ आहे आणि खारीला वाईट दुनिया कधीच दाखवायची नाही, कारण ती राजकुमारी आहे' हे आईचे शब्द तो विसरलेला नाही. खारीला जपण्याचा , तिला स्वतःच्या डोळ्यांनी ही दुनिया दाखवण्याचा, स्वप्ने रंगवण्याचा, तिला आणि स्वतःलाही या निर्दयी जगात जगतं ठेवण्याचा विलक्षण प्रयत्न बिस्किट करतोय.तिचे आईबाबा, भाऊ , मित्र सगळं तोच बनलाय. ते करताना तो तिला आभाळात कटलेला चाँदतारा (पतंग) आणून देण्यासाठी घरांच्या छपरांवरुन धावतो. शाहरुख, सलमानचे सिनेमे दाखवतो. खारीची शाहरुख शी, सचिन तेंडुलकरशी भेट घालून देतो...कशी ते सिनेमातंच पहाणं गमतीशीर आहे.

खारीला विदारक वास्तवाची झळ पोचू न देताना, तिला मोठा शॉवर (फुटलेली पाईप लाईन),  विमानातून उंच आकाशातून भरारी ( स्वच्छतागृहावरची टाकी), झोपायला मोठी खोली(भिंतच नसलेली आकाशाच्या छपराची झोपडी) असे वेगवेगळे अनुभव देताना बिस्कीटला आपण खोटं बोलतोय, वागतोय याचीही जाणीव आहे. पण वस्तीतली माई, जगायला एखाद्या खोट्याचाही कधी कधी आधार होतो हे झोपडपट्टीतली माई (जसा गल्लीतला दादा तशीच ही माई...पण जरा आगळ्याच रुपातली) हे इतरांची उदाहरणे दाखवून पटवते  तो सीन खूप छान जमलाय.

एवढ्या विपरीत परिस्थितीत राहूनही आपल्या इतर मित्रांप्रमाणे चोरी करणे किंवा भीक मागणे हे बिस्कीटला मान्य नाही , तो सच्चाईने वागायचाच प्रयत्न करत असतो. तो बहिणीसाठी त्याला जो चांगला मार्ग वाटत असतो तोच
चालतो...त्याच्यासाठी त्याची बहीण लकी असते...ती जे म्हणते ते खरं होतं हा त्याचा विश्वास असतो आणि इतरांनाही तो ते पटवून देत असतो...

याच प्रवासात २०११चा क्रिकेट वर्ल्डकप भारतात होणार आहे हे सांगणारा सचिन तेंडुलकरचा बॅनर वस्तीत लागतो . सचिनचा हा शेवटचा वर्ल्डकप , तो त्याने , भारताने जिंकलाच पाहिजे अशी वेडी आशा खारीच्या मनात असते. आपण भेटल्यानंतर शाहरुखचा सिनेमा चालतो, मग आपण वर्ल्डकप पाहिला तर सचिन आणि भारत नक्कीच जिंकेल हा तिचा विश्वास आहे आणि बिस्कीटचाही...नेहमीप्रमाणे बिस्किट आणि त्याचे दिलदार मित्र वस्तीत  आभासी वर्ल्डकप बनवतो पण खारीला त्यातला खोटेपणा कळतो...
आता खरा प्रश्न खारी वर्ल्डकप बघायला जाणार कशी? त्यांची तिकीटे कशी काढणार? बिस्कीट तिकिटाच्या पैशांसाठी वाईट कामे करणार ? का भीक मागणार? त्याला कोण मदत करतं, कोण खोडा घालतं...भारत वर्ल्डकप जिंकला ही खरी घटना पण खारी बिस्कीटने सामना पाहिला का नाही हे दाखवताना  सिनेमाचा उत्तरार्ध रंगतदार झालायं आणि ते सिनेमा पाहूनच बघावं.

खारीचं काम करणाऱ्या वेदश्री खाडिलकर ने गोड काम केलंय. एका पाच वर्षांच्या मुलीला आंधळं दाखवून ते हावभाव चेहऱ्यावर सतत ठेवणं सोपं नाही. आदर्श कदम या धिटुकल्या मुलानं बिस्किटच्या कामात जान  ओतलीय. या दोघांकडून तसंच त्यांचे मित्र- मांजा, मॅजिक, मदत करणारे चाचा, वेगवेगळ्या कलाकारांचे आवाज काढणारा चिंधी , गुंड प्रवृत्तीचा त्रास देणारा किटली या सर्वांनी अभिनय केलाय असं वाटतंच नाही, एवढं छान काम त्यांनी केलंय आणि हेच संजय जाधवची दिग्दर्शक म्हणून यश (काही वेळा चित्रपट स्लो होतो आणि तिथल्या तिथंच फिरतोय असं वाटतं) . नंदिता धुरीची 'एलिझाबेथ एकादशी' नंतर ची दमदार भूमिका, मुलांशी असलेली अटॅचमेंट ती छान व्यक्त करते...कधीतरी मधेच तिच्यात उषा नाडकर्णींचा  भास होतो. संजय नार्वेकर छोट्या भूमिकेत लक्षात रहातो आणि सुशांत शेलार नगण्य भूमिकेत फारसा प्रभाव पाडू शकत नाही.

एकूणातच 'मी सारी जिंदगी तुला जपणार आहे' हे ब्रीदवाक्य घेतलेल्या बिस्किट आणि त्याची भाबडी अंध बहीण खारी यांचं निरागस भावविश्व पहाण्यासाठी,  विदारक आयुष्य जगतानाही आवाक्याबाहेरची स्वप्ने पाहून विजिगुषी वृत्ती बाळगून ती पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या बहिण-भावाची गोष्ट पहाण्यासाठी, यांत्रिक स्वार्थी युगातील मानवी भाबडेपणा दाखवणारा  *खारी बिस्कीट* पहायलाच हवा.

© राहुल लाळे
०३.११.२०१९

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका