ऑक्टोबर


*ऑक्टोबर*

राहुल लाळे
Oct 2018


आज शुजीत सरकार / वरुण धवनचा " ऑक्टोबर" पाहिला. जेमतेम २ तासाचा सिनेमा, एकही गाणं नाही, मारधाड - पाचकळ विनोद किंवा नेहमीच सवंगतेचा फिल्मी मसाला नाही. विषय मेलोड्रामाकडे झुकणारा असला तरी मेलोड्रामाही नाही. वरुण सोडला तर सिनेमातले कलाकारही नवीनच, तरीही २ तास कसे गेले कळले नाहीत.

सिनेमाची स्टोरी, तिचा पसाराही फार काही विस्तारित / मोठा नाही. दिल्लीतल्या द्वारकामधील रॅडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमधील शिकाऊ शेफ्स - त्यातलाच एक  दानिश -डॅन (वरुण), त्याचे रूम पार्टनर मित्र आणि मैत्रीण आणि इतर शिकाऊ उमेदवार - त्यातलीच एक शिऊली अय्यर (नवोदित बनिता संधू) .

वरुण एक रुटीन न  पाळणारा , थोडासा  विद्रोही - अगदी  गमत्या नाही पण फार सिरीयस ही नाही असा - टॉवेल्स - बेडकव्हर्सवर नाचणारा-हॉटेलमध्ये येणाऱ्या घमंडी गेस्ट च्या पर्सनल गोष्टी उघड करून त्यांना कधी कधी ऑकवर्ड करणारा - बार मधील ड्रिंक्सच्या बाटल्या लंपास करणारा - आणि त्याबद्दल बऱ्याच वेळेस बोलणी खाल्लेला .  त्याच्या उलट शिऊली - ज्युनियर  असूनही सिन्सियर . त्या दोघांत प्रेम सोडाच फार मैत्रीही नाही.

नव्या वर्षाच्या रात्री  तिसऱ्या मजल्याच्या गच्चीत पार्टीत कठड्यावर बसताना शिऊलीचा अंदाज चुकतो -काही कळायच्या आतच ती खाली पडते आणि अनेक मोठ्या जखमा होऊन कोमात जाते. डॅन  तिथे नसतो. जेव्हा त्याला कळते तेव्हाही तो शिऊलीला भेटायला नाखुशीनेच जातो. पण जेंव्हा त्याची सहाध्यायी मैत्रीण म्हणते की पडायच्या आधी शिऊलीने विचारलं  की" व्हेअर इज डॅन ?" तेव्हा त्याला काही एक अनामिक भावना जागृत होते आणि कोमात  असणाऱ्या शिऊलीपाशी  राहण्याची ओढ वाढतेच - आणि तीही इतकी की काम सोडून दिवस रात्र तिच्या जवळ राहतो - तिच्या आईला मदत करतो,प्रसंगी  मित्रांकडून पैसे उधार घेऊन तिच्यासाठी औषधे आणतो. तिचा काका सपोर्ट सिस्टीम काढून टाका सांगत असताना "ती तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही तुला ओळखता ना ? " हे विचारतो. तिचीही जगण्याची इच्छा असेलच की हे ऐकवतो.

 शिऊलीने गोळा केलेली प्राजक्ताची फुले कामावर डुलक्या काढताना त्याच्याकडून पडतात आणि एका पहाटे घराबाहेर पडलेली ती फुले - कोमात  असलेल्या शिऊलीजवळ ठेवतो- आणि ती थोडा प्रतिसाद द्यायला लागते - पण आई-भाऊ -बहिणीला ओळखते पण डॅनला  नाही. सुरवातीला ओळखलं नाही म्हणून नाराज होणं आणि नाही ओळखलं ते बरंच  झालं असं म्हणणं - हे वरुणने फारच उत्कटतेने सादर केलंय.

कामावर दांड्या, भांडणं  यांमुळे कामावरून  काढून टाकल्यावर डॅनची आई येते - ती आणि शिऊलीच्या आईमधले  संवाद आणि त्यानंतर शिऊलीच्या  आईने डॅनला तू तुझे करियर सांभाळ हे सांगणं - प्रत्यक्ष पडद्यावरच पाहिलं पाहिजे.

सिनेमाचं शूटिंग बरचसं  दिल्लीत  - रॅडीसन हॉटेल, द्वारका, डिफेन्स कॉलनी आणि काही कुलू मनाली - डॅन  जिथे एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो - तिथलं. - आणि मुख्यतः हॉस्पिटलमधलं.

शिऊलीच्या भूमिकेत नव्या बनीता संधूला फार संवाद नाहीत - हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येला जखडून राहणे हेच काम - पण डोळ्यातले भाव दाखवून की अगतिकता - ओळख पटवण्याची धडपड - हे दाखवणं केवळ --निशब्द  !!!

वरुणने त्याच्या "जुडवा" इमेज मधून बाहेर पडून - एक वेगळी आणि  - तापटपणा - विनोदाचे टाईमिंग - हळवेपणा सर्वच भाव एका ताकतीने सादर केलेत.

सिनेमाचं टायटल "ऑक्टोबर" का ठेवलं ? हे ही शेवटी फार छान सांगितलंय - शिऊलीची आवडती प्राजक्ताची फुलं - ऑक्टोबरमधेच जास्त उमलतात - सफेद रंगांची केशरी देठांची नाजूक फुलं पहाटे बागेत - अंगणात सडा घालतात - क्षणभंगुर आयुष्य जगून  सुवास दरवळत प्रेमाचा सुवास दरळवतात - शिऊलीची  आवडती प्राजक्ताची फुलं निष्काळजीपणे सांडणारा डॅन - शेवटी " व्हेअर इज डॅन ?" या प्रश्नाने अस्वस्थ झालेला -एका प्रेमाच्या क्षणिक शक्यतेने भारावून गेलेला डॅन तिचं  आवडतं प्राजक्ताचं  झाड - प्राजक्तासारखं अल्पायुषी शिऊलीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जपायला घेऊन जातो - आणि तीच भावना जपण्याचे मनात बाळगून  प्रेक्षकही थिएटरच्या बाहेर पडतो

जरूर पहा -अमेझॉन प्राईमवर आहे

ऑक्टोबर

©राहुल लाळे 

वैधानिक सूचना...
चित्रपटाची कथा जरा संथगतीने जाणारी आणि एका मर्यादित वर्तुळात फिरणारी आहे असं  नेहमीचे मनोरंजनात्मक चित्रपट पहाणाऱ्या रसिकांना वाटू शकेल.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका