साच पास, हिमाचल, एक थरारक स्वर्गीय प्रवास
साच पास... एक थरारक स्वर्गीय प्रवास
© राहुल लाळे
खज्जिआर , ग्रीन व्हॅली, दायन कुंड (डैंडकुंड), कालाटोप, चंबा आणि इतर ठिकाणांना जाताना दूरवर दिसणारे बर्फाच्छादित उंच पर्वत फारच आकर्षक पण थोडे भयावहही दिसत होते. ड्रायव्हरला विचारलं ते कोणते पर्वत आहेत..."साच पास" म्हणून उत्तर मिळाले. नेट वरून माहिती काढली. डलहौसी पासून साधारण १५० किमी अंतरावर चंबा जिल्ह्यातलं १४५०० फुटांवर असलेलं ठिकाण. हा पास चंबा आणि पांगी या दोन व्हॅलीज् ना जोडतो. पठाणकोटहून लेहला मनाली वरुन जायला ८०० किमी.लागतात तर साच पासमधून हे अंतर १५०-१६० किमीने कमी होतं...म्हणून हा रस्ता आर्मीने बांधलाय. इथून किल्लार, किलॉंग, लेह, रोहतांग पासकडून मनाली, स्पिती व्हॅलीकडे ही जाता येतं. पण रस्ता एकदम अरुंद आणि अवघड आहे. जगातील सर्वात टफ रस्त्यातील तीन नंबरचा म्हणून ही कळालं.
एवढं समजल्यावर आधी ठरलेला प्लॅन बदलून साच पासला जावं का हा कीडा डोक्यात आला. ड्रायव्हर कडून बैरागढ या साचपासच्या अलीकडे असलेल्या त्याच्या ओळखीत फोन करून चौकशी केली की पास उघडला का नाही. कारण गुगलवर तो जून जुलै मध्ये उघडतो असं लिहिलेलं...
३ दिवसांपूर्वीच पूर्ण नाही पण रानीकोटपर्यंत साच पास उघडलाय हे कळालं. मग साचपासलाच जायचं नक्की केलं. ड्रायव्हर नेही तयारी दाखवली.
रस्ता खरोखरच भयंकर होता. पाचगणीहून वाईला पसरणीघाटातून जाताना वाई खाली दिसतंच रहातं, हे पहाताना खूप मजा येते. इथं तर पूर्ण प्रवासच घाटातला आणि डलहौसी-बनीखेत- रावी नदीवरचं चमेरा पॉवर स्टेशन सोडलं तर कंदला , सुरांगणीनंतर ६०-७० किमीचा घाटरस्त्याचा प्रवास अक्षरशः जीव मुठीत घेऊन करायला लागतो. एकच जागा- एखादा पूल वर-वर गेलो तसं त्याच लोकेशनवर खालीखाली जाताना दिसत रहाते ..
एकावेळी एकच गाडी जाईल एवढाच रस्ता. समोरून गाडी आली तर कुणीतरी एकानं मागं घ्यायची किंवा बाजूला घेऊन थांबायचं. जबरदस्त पोटात धडकावणारी दरी, दरीच्या दोन्ही बाजूला उंचच उंच पर्वतरांगा, त्यातून जाणारे रस्ते, दऱ्या खोऱ्यात वसलेली घरं, गावं , सफरचंदाच्या बागा, पाईन, फर -देवदारची झाडं, नद्या, उंच पर्वंतावरचे हिमकडे, रस्त्यातच कोसळणारे धबधबे पाहून डोळ्यांचं पारणं फिटते आणि काही वेळा डोळे अक्षरशः फिरलेही. आणखी एक गंमत म्हणजे पुढे जाताना हिमपर्वत जवळ येतायत असं वाटत असतानाच, तेही हळूहळू थोडे मागं सरकण्याचा भास होतो.
सकाळी सव्वा सहाला डलहौसी सोडलं , जाताना चमेरा पॉवर स्टेशन नंतर भलेई येथील भद्रकाली देवीचे दर्शनही घेतले, आणि बैरागढ चेकपोस्टला(१४० किमी) ११ वाजता पोचलो. तिथे थोडी पेटपूजा करून आणि पोलीस चेकपोस्ट वर नाव नंबर नोंद करुन, आमची ओळखपत्रे तपासूनच पुढे साचपास कडे प्रवास चालू केला....चेकपोस्ट्वर त्यांनी रानीकोटपर्यंतच शक्यतो जा असा दम वजा सल्लाही दिला होता.
पुढचा प्रवास म्हणजेच बैरागढ ते साचपास म्हणजे आणखी मोठं दिव्यही आणि पर्वणीही...१०-१२ किमी बर्फ अधून मधून रस्त्यावर पडलेला, रस्त्यावरून वहाणारे ओढे , धबधबे आणि अत्यंत अरुंद आणि मोटोक्रॉसची अडथळ्यांच्या शर्यतीची आठवण करुन देणारी वाट, छान देवदारची आणि इतर अनेक झाडं कायम लक्षात रहातील. चेकपोस्ट पासून रानीकोट ५ किमी आहे, एक दीड किलोमीटर मधेच रस्त्यावर एका बाजूला बर्फाची भिंत आणि डावीकडे बर्फ आणि झाडांची खोल दरी. आम्ही आता रानीकोटच्या पुढे कालाबन मागे टाकून सत्रुंडीपर्यंत आलो होतो. ड्रायव्हर बाबूराम ठाकूरचीही कमाल, अत्यंत सफाईने त्यानं गाडी वर नेली.. आणि अचानक ...ओव्हर कॉन्फिडन्स अंगाशी आला...एका वळणावर समोर त्या अरुंद रस्त्यात बर्फाची खिंड आली आणि 'रुको रुको' म्हणेस्तोवर ड्रायव्हरने गाडी दामटली आणि बर्फात गाडी अडकली...ना पुढे ना मागे....आता आम्हाला टेन्शन... कारण त्या चेकपोस्ट्वर आमच्या आधी फक्त २ गाड्यांची एन्ट्री होती आणि त्यातली एक गाडी आधीच परत जाताना दिसलेली (पुढे रस्ता बंद आहे म्हणून सांगून ), आणि दुसऱ्या गाडीतले गाडी थोडी अलिकडेच लावून पुढे गेलेले...
गाडीला पुढे मागे करुन ,धक्का मारुन , चाकांखाली दगडाचा सपोर्ट लावून गाडी बाहेर काढली. एवढ्यात गाडीच्या चाकांचा आवाज ऐकून पुढे गेलेल्या गाडीतले फार पुढे न गेलेले कपलही मागे आले.
गाडी मागे घेऊन पार्क केली आणि मग पुढचा ८-१० किमीचा ट्रेकला सुरुवात केली. गाडी अडकून पडलेली ती १०-१५ मिनिटे एकदम खतरनाक अनुभव होता, कारण मोबाईल कवरेज शून्य, मागे १५-२० किलोमीटरपर्यंत कोणी नाही, पुढचा रस्ताही बंद...आज लिहिताना गंमत वाटतीय पण काल थरथराट झाला होता.
पुढचे दोन अडीच तास मात्र केवळ अवर्णनीयच....स्वर्गात जायचे रस्ते असेच असावेत बहुतेक. वेगवेगळ्या रंगांची झाडं, खोडांचे विविध रंग, बर्फातला रस्ता, डोक्यावर पडणारं पाणी, चारी बाजूला पसरलेले बर्फाचे पर्वत, त्यातून फक्त पोस्टर मधे स्वित्झर्लंड किंवा अन्य ठिकाणचे दाखवतात तसे देखावे, बर्फ जमिनीवर- झुडुपांवर पडून तयार झालेले नानाविध आकार... काय काय वर्णन करायचे... बरंचसं डोळ्यात साठवल़ं...काही मोबाईल कॅमेरात .... ट्रिप-ट्रेक मात्र कारणी लागला. आणि हे सर्व एन्जॉय करायला फक्त आम्ही दोघंच नवराबायको... आणि पुढेमागे ते दुसरे आमच्यासारखेच वेडे जोडपे..
हे सर्व अनुभवल्यावर सिमल्याचं कुफ्री, मनालीचं रोहतांग पास-गुलाबो ला पैसे आणि वेळ अक्षरशः वाया घालवले असं वाटलं. तिथली गर्दी, कचरा, घोड्यांनी केलेली घाण... इथं त्याचा नामोनिशाण नाही.. आणि तिथल्या आणि सोनमर्ग-गुलमर्ग सारखा बाजारही नाही... पण एक मात्र जाणवलं की सुरक्षेच्या बाबतीत जास्त हुशारी करायची नाही आणि जमलं तर अशा ठिकाणी आणखी कोणी सहप्रवासी नेता आले तर बघावे... पण जास्त गर्दी ही नकोच... आणि असे वेडे मिळायलाही हवेत.
अगदी साच पासपर्यंत जाता आलं नाही, पण जवळ जायला मिळालं काही कमी नाही. रस्ता खचलेला...आता चालायला ही थोडा त्रासदायक वाटायला लागलेला.. बायकोच्या गमबुटांत पाणी जायला लागून ती अनवाणी चालत असल्याने थंड पडत जायची शक्यता आणि सकाळचं स्वच्छ सूर्यप्रकाश कमी होऊन ढग आले व थोडा पाऊस-स्नो फॉल सुरु झाल्याने नाईलाजाने परत फिरलो.. तसंही रात्रीपर्यंत डलहौसीला परतायचं होतं.
पुढच्या वेळी जर जमलं तर बैरागढला मुक्काम करायचा आणि जून-जुलैमध्ये रस्ता थोडा मोकळा झाला की यायचं असं ठरवून परत निघालो.
एक सांगायचं राहिलं, बैरागढच्या अलीकडे खचलेला रस्ता दुरुस्तीचं काम PWD चे काही कामगार एवढ्या रिमोट ठिकाणी करत होते... हाच रस्ता बनवताना पूर्वी कालाबन आणि सत्रुंडीच्या मधे १९९८ मध्ये अतिरेक्यांनी काम करणाऱ्या ३५ हिंदू व बौध्द मजूरांची अमानुष हत्या केली होती. त्यांचं स्मारकही त्याठिकाणी बांधलंय हेहि विशेष. त्या घटनेमुळेच इथली सुरक्षा वाढवली गेली आणि टुरिस्ट्स व ट्रेकर्स इथं यायला लागले ही माहिती मिळाली.
आज सकाळी हॉटेल सोडताना रिसेप्शनिस्टजवळ विषय निघाला तेव्हा त्याचेही डोळे हलले... म्हणाला विचारलं असतंत तर जाऊ नका म्हणून सांगितलं असतं , कारण मागील वर्षी दोन फॅमिली लँड स्लाईड मध्ये अडकलेल्या
आणि मोबाईलला रेंज नसल्याने अडकून पडलेल्याचा त्यांचा अनुभव...
असो , आमचा अनुभव तर असा.....थरारक पण अवर्णनीय
© राहुल लाळे
०४-०५-२०१९








Comments
Post a Comment