ताश्कंद फाईल्स....काही प्रश्न
*ताश्कंद फाईल्स्....एक जबरदस्त आय ओपनर*
© राहुल लाळे
गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे पाहिले, मनोरंजनात्मक, सांगीतिक, राजकीय, सामाजिक , काही भावले. काहींवर लिहिलं , काहींवर राहिलं. पण हा सिनेमा पाहिला आणि लिहूनच व्यक्त झालं पाहिजे असं वाटलं.
इतिहास हा शाळेपासून आवडीचा विषय... खरं म्हणजे शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या सुरस वाटणाऱ्या पण स्फुरण जागवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या , स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाच्या पराक्रमामुळे. इतिहास शिकताना, नंतर महाराजांप्रमाणेच पारतंत्र्याविरुध्द लढून भारत स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही तेवढाच आदर आणि कुतूहल वाढत गेलं.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आझाद हिंद सेना स्थापन करणं, त्यासाठी देशाबाहेर जपान, जर्मनी मध्ये जाऊन मदत गोळा करणं आणि संशयास्पदरित्या विमान अपघातात मृत्यू होणं हे वाचून मन फारच अस्वस्थ व्हायचं. तीच गोष्ट *जय जवान जय किसान* हा नारा देणाऱ्या आणि *मूर्ती लहान कीर्ति महान* अशी ओळख असणाऱ्या भारताच्या दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. १९६५ चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकून देणारा पंतप्रधान पाकिस्तानी अध्यक्ष आयुबखानशी शांतता कराराच्या गोष्टी करायला ताश्कंद मधे जातो आणि तिथेच त्याच रात्री ताश्कंद (हाच उच्चार पूर्वी पासून करत आलोय, त्यामुळे ...) मधे प्राण सोडतो, हे वाचून थोडं हळहळलो होतो. पुढे कळायला लागल्यावर याविषयी कुठंतरी वाचायचो की हा मृत्यू संशयास्पद होता..पण तेवढंच.
जेव्हां ताश्कंद फाईल्सचं ट्रेलर पाहिल्यावरच तो पाहिलाच पाहिजे हे नक्कीच केलं..
२ ऑक्टोबर म्हणलं की गांधीजयंतीची सुट्टी, , हे ही लहानपणापासून मनावर कोरलेलं (ड्राय डे नंतर)....याच दिवशी निस्सीम गांधीभक्त माजी पंतप्रधान शास्त्रीजींचाही जन्मदिवस असतो...पण मग हा दिवस शास्त्रीजयंती का नाही? त्यांचं नाव बातम्यांतही शेवटी... गांंधीजयंतीचा सर्व अहवाल झाल्यावर एका ओळीतच त्यांचा उल्लेख का? असे प्रश्न तेव्हाही पडायचा. नेमका हाच प्रश्न रागिणी फुले ( श्वेता प्रसाद बसू) या राजकीय पत्रकारितेत पाय रोवू पहाणाऱ्या उदयोन्मुख पत्रकाराला पडतो. पडतो म्हणण्यापेक्षा राजकीय शोध पत्रकारितेतून आर्ट्स व कल्चर मध्ये बदली होईल अशी धमकी तिच्या संपादकाकडून मिळाल्यावर एखादं खळबळजनक राजकीय स्कूप प्रसिद्ध करायचं ठरवताना आलेल्या एका अनोळखी कॉलमधून मिळालेल्या हिंट मधून. याचं प्रश्नाचे उत्तर शोधताना आणखी किती धक्कादायक प्रश्न उभे रहातात,त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, रागिणी त्यात कशी भावनिक रित्या गुंतत जाते, प्रत्येक सामाजिक व राजकीय व्यवस्थेचे विविध पैलू हा सिनेमा सादर करतो
रागिणीच्या फ्रंटपेज न्यूजमुळे एकच खळबळ उडते.
विरोधी पक्षनेते शामसुंदर त्रिपाठी (मिथुन चक्रवर्ती) परिस्थितीचा फायदा घेऊन शास्त्रींजींच्या मृत्यूमागील सत्य बाहेर आले पाहिजे असा तगादा जनमानसात व मीडियात चालू करतात. उडालेला गदारोळ शमवण्यासाठी गृहमंत्री पी के नटराजन(नसिरुद्दीन शाह) चौकशी समिती नेमतात, तीही एक राजकीय खेळ खेळून त्रिपाठीनाच कमिटीचा अध्यक्ष बनवून. या कमिटीत एक इतिहास संशोधक(पलल्वी जोशी), एक भगव्या विचारांचा शास्त्रज्ञ ( पंकज त्रिपाठी), अनेक एनजीओ चालवणारी समाजसेविका (मंदिरा बेदी), निवृत्त न्यायाधीश, रॉ चा माजी संचालक( प्रकाश बेलवडी) , एक राजकारणी या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींचा समावेश होतो. त्रिपाठी एक खेळी करत खुद्द रागिणीलाही सामिल करून घेतात. या सर्वच मंडळींचे आपले स्वतःचे मोटीव्ह, अजेंडे आहेत, इगो आहेत. काही जणं विषयावर खरोखरच प्रामाणिकपणे चर्चा व्हावी व सत्य बाहेर यावे या उद्देशाने तर काही काहीच निष्पन्न होऊ नये या राजकीय हेतुने घुसवलेले. सर्वांच्या आपापसातील चर्चेतून, वादांतून, प्रतिवादांतून, पुढे आलेले संदर्भ आणि पुरावे यातून अनेक धक्कादायक मुद्दे पुढे येतात. प्रत्येकाची मते दोलायमान होतात, बदलतात, मतदान घेऊन निर्णय घेताना कधीतरी त्रिशंकू स्थिती होते, वातावरण तापते. बंद खोलीतील हे वादविवाद पहाताना बासू चटर्जींच्या 'एक रुका हुआ फैसला' हा पंकज/अन्नू कपूर, केके/एमके रैना प्रभृतींनी काम केलेल्या चित्रपटाची आठवण जरूर आली. या
चौकशी आयोगाच्या सभासदांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, कधी निलाजरेपणाचे, कधी कुचंबणेचे, अगतिकतेचे, बेदरकारपणाचे आणि बेरडपणाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने छान सादर केलेत.
"यह सत्य और अहिंसा का देश है, गांधी और नेहरू का देश हैं...." असं तावातावाने कमिटीतला राजकीय नेता विचारतो तेव्हा ".... शास्त्रीजी का क्यों नहीं?' असं रागिणी शांतपणे विचारते, हा सीन मस्त जमलाय. खरा टेररिजम परवडला पण पॉलिटिकल, सोशल, कम्युनल, टीआरपी, धार्मिक दहशतवाद देशाला जास्त भयावह आहे हे त्रिपाठी(मिथुन) म्हणतो तेव्हा या सभ्यतेचा बुरखा पांघरणाऱ्यांचा रागच येतो.
सत्यमेव जयतेचा संदेश जगाला देणाऱ्या देशातच एक
नेता म्हणतो "राजनीती में कुछ सच नहीं होता, यही राजनीती का सच है" , "लोगोंको सच पसंद नहीं, सच की कहानी पसंद आती है" आणि देशाचा मंत्री म्हणतो, "Truth is luxury and we cannot afford it" हा किती दैवदुर्विलास आहे. राजकीय विदारकतेची दशकांपासून चालत आलेली ही अवस्था दिग्दर्शकानं नेमकी मांडलीय.
हा सिनेमा अनेक प्रश्नांचा गुंता आपल्यासमोर मांडतो...
आपल्या देशाचा पंतप्रधान आपल्या कट्टर शत्रूदेशाचा पराभव केल्यानंतर, त्याच्याशी शांतता करार करण्यासाठी त्रयस्थ देशात जातो. करारावर सही करताना तब्येत ठणठणीत असते , परत आल्यानंतर एक चांगली बातमी सांगतो असं भारतात फोनवर बोलतो , पण केवळ सात आठ तासांत रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही वेळाने थर्मासमधील दूध पिल्यानंतर काही वेळाने अस्वस्थ वाटून अकस्मात मरण पावतो... थोडं विचित्र वाटतं...
नंतरही अनेक संशयाला जागा असणाऱ्या गोष्टी पुढे येतात... अनेक प्रश्न सामोरे येतात...
१. शास्त्रीजी ज्या हॉटेलमध्ये आधी राहणार असतात, त्याऐवजी दुसऱ्याच एका बंगलीत त्यांची सोय केली जाते
२. त्यांच्या खोलीत बेल नाही, इंटरकॉम-फोन नाही, ऑक्सिजनची सोय नाही
३. त्यांचा पूर्ण सपोर्ट स्टाफ त्यांच्या बरोबर नव्हता, फक्त पर्सनल डॉक्टर चुग आणि एक खानसामा होता
४. ज्या ग्लासमधून , थर्मास मधलं दूध त्यांना रात्री दिलं गेलं, त्याकडे ते अस्वस्थ असताना निर्देश करत होते, त्याचा अर्थ काय? आणि तो ग्लास व थर्मास नंतर बेपत्ता झाले आणि कायम बरोबर असणारी लाल डायरीही परत येत नाही...
५. त्यांच्या मेडिकल रिपोर्टच्या विश्वासार्हतेबद्दलही साशंकता होती, दोन रिपोर्ट्स समोर आले. दोन्ही रिपोर्ट मध्ये फरक होते. त्यातल्या एका रिपोर्टवर आठ पैकी सहाच डॉक्टरांच्या सह्या होत्या. दुसऱ्या रिपोर्टमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालाय यावर साशंकता आणि सर्व डॉक्टरांच्या सह्या ही विसंगती कशी?
६. हृदयविकाराच्या पेशंटला इंट्राव्हेनस इंजेक्शन द्यायला हवे, त्याऐवजी इंट्रामस्क्युलर इंजेक्शन का दिले गेले?
७. रशियन खानसामा अब्राहम सातारोव्ह आणि इतर सपोर्ट खानसाम्यांना , बदली खानसाम्या जानमहंमदला केजीबीने विषबाधेच्या संशयावरुन पकडले होते.. नंतर त्यांच्या तपासणीतून काय निघाले?
८. शास्त्रीजींचे शरीर काळेनिळे पडलेले पाहून त्यांच्या आई, पत्नी ललिता, मुलं आणि इतर कुटुंबीयांनाही विषप्रयोग झाला असा संशय होता...
९. एखाद्या बेवारस मिळालेल्या पार्थिवाचे ही पोस्टमार्टेम होते... मग अशा संशयास्पद रित्या परदेशात मरण
पावलेल्या पंतप्रधानांचे पोस्टमार्टेम का झाले नाही?
१०. पोस्टमार्टेम झालं नाही, तर त्यांच्या पोटावर, शरीरावर
जखमा कसल्या? त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या गांधीटोपीवर रक्ताचे डाग मिळाले, ते कुठून आले?
११. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर १२-१३ दिवसांत अणुशक्तीच्या संशोधनातून अणूबॉम्ब विकसित करायच्या अगदी जवळ आलेल्या डॉ होमी भाभांचा विमान अपघातात झालेला मृत्यु होणं... हा केवळ योगायोग? का भारताचा पाकिस्तान वरील विजय आणि अणुबॉम्ब विकासाचं क्रेडिट मिळून पुढे त्यांची साधंसरळ वाटणारं पण प्रत्यक्षात भलतंच कणखर निघालेलं व्यक्तीमत्व नंतर
आणखीन जड होईल म्हणून....
१२. शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर काही वर्षात तेव्हाचे दोन प्रत्यक्ष साक्षीदार अपघातात (का घातपातात?) मरण पावतात हाही योगायोग?
१३. किंग कायम नजरेत रहातो, किंगमेकर नाही. नेहरूंच्या मृत्यूनंतर ज्येष्ठतेनुसार मोरारजी देसाई पंतप्रधान व्हायला हवे होते...पण किंगमेकर कामराज यांनी शास्त्रींचे नाव पुढे केले...आणि शास्त्रीजींनंतरही मोरारजींऐवजी इंदिराजी... परत कामराज...?
१४. ताश्कंद मधील शांतता करारानंतरच्या एका फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत असा निर्देश होतो...हीच असते का ती चांगली बातमी?... मग पुढे ..
१५. शास्त्रीजींच्या मृत्यूचा फायदा कोणाला होणार होता?
१६.ल्युटियन्स दिल्लीवर कब्जा मिळवला की देशावर ताबा हे ५० वर्षांपासून चालू आहे?
१७. आरटीआय च्या अंतर्गत माहिती मिळण्यासाठी
वारंवार होणाऱ्या अर्जांची विल्हेवाट का लावली गेली?
१८. सध्या देशाची घटना संकटात आहे असा आरडाओरडा होत असताना , त्याच घटनेत बदल करून सोशालिस्ट शब्द कसा काय घुसडला जातो?
१९. हा चौकशी आयोग म्हणजे केवळ वेळेचा व पैशाचा अपव्यय ? पिढ्या उलटून गेल्यावर चौकशी व्हावी ही मागणी करणारी रागिणी ही नवीन पिढीची बेजबाबदार व्यक्ती आहे, का ...देशाच्या दुसऱ्या पंतप्रधानांच्या संशयास्पद मृत्यूचं गूढ दूर होऊन देशाची न्यायी ,सहिष्णू प्रतिमा उजळावी, देशाची, महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षेची मागणी करणारी देशाची सर्व कर नियमित भरणारी प्रामाणिक नागरिक?
२०. सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणाऱ्याची अवस्था किंवा दशा कशी होणार? इतिहास जो खरा आहे तो दाखवला जाणार, का काही ठराविक जणांना सोईस्कर आहे तसा?
आणखी ही बरेच प्रश्न अवघ्या २ - २:३० तासांत हा सिनेमा उभे करतो. यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि इतर सपोर्ट स्टाफने या विषयावर केलेला रिसर्च दिसून येतो. आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनुज धर, शास्त्रीजींची मुले अनील व सुनील, नातवंडे यांचे इंटरव्ह्यू, इनपुट्स फारच महत्वाचे. ते आणि काही जुन्या क्लिप्स दाखवताना ही डॉक्युमेंटरी होणार नाही याची पूर्ण खबरदारी ही घेतलीय. केजीबीचा पहिला डायरेक्टर वॅसिली मित्रोखिनचे (जो नंतर ब्रिटनच्या आश्रयाला गेला) गुप्त अर्काईव्हज, Political Mysteries आणि Conversation with Crows आणि अशा अनेक पुस्तकांचे तसेच सीआयए चा रॉबर्ट टर्नबुल याचे दस्तऐवज यांचे संदर्भ सिनेमाच्या हेतूपर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाण्यास मदत करतात. शेवटी सादर केलेले आणि काही न दाखवण्यासाठी व्हाईटनर लावून दाखवलेले संदर्भ लिखाण आणि काही छायाचित्रे आपल्याला काही सुचवू पाहतात पण शेवटी खरं काय खोटं काय हे गुलदस्त्यातच....कारण त्याची सो कॉल्ड विश्वासार्हता !!!
सिनेमाचा मेन प्लस पॉईंट हे त्याचं कास्टिंग आहे. मिथुन चक्रवर्तीनी त्रिपाठीच्या बेरकी विरोधी नेत्याच्या भूमिकेत धमाल आणलीय. नसिरुद्दीनची सध्याची राजकीय भूमिकाच त्याने सिनेमात तंतोतंत उभी केलीय. मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, बेलवडी, राजेश शर्मा आणि इतर सर्वांचीच कामे चोख. सर्वात कमाल केलीय इक्बाल आणि मकडीमधून बालकलाकार म्हणून काम केलेल्या श्वेता प्रसादने. तिच्याभोवती सिनेमा पुढे सरकतो आणि तिने ही मध्यवर्ती भूमिका जोरदार सादर केलीय. विनय पाठकही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत लक्षात रहातो.पटकथा, संकलन, छायांकन, बॅकग्राउंड म्युझिक आणि इतर सर्वच तांत्रिक बाबी हा सिनेमा एक राजकीय पण उत्कंठावर्धक थ्रिलर बनवायला मदत करतात.
आत्ताच एक सिनेमा प्रदर्शित व्हायला स्थगिती आणली गेली असताना या चित्रपटाला ग्रीन सिग्नल कसा मिळाला हे आश्चर्यच !!!
उत्तर काय आहे हे काळ ठरवेल..पण ५३ वर्षांनंतर प्रश्न विचारण्याचं धाडस या सिनेमाद्वारे निर्माते विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी या दांपत्याने केलंय, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... अजूनही बरेच प्रश्न आहेत.. शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांच्या पासून अनेक जणांचे काय झाले हे प्रश्न उभे राहतील. तो दिवस खरा...
नवीन पिढीला आणि आपल्याही पिढीला आपला इतिहास असाही होता आणि और भी लोग थे देश में...हे दाखवण्यासाठी आणि माहिती मिळवण्याचा अधिकार शाबूत रहाण्यासाठी *ताश्कंद फाईल्स्* जरुर पहा....लगेच
*जय जवान जय किसान*
© राहुल लाळे

Comments
Post a Comment